पुण्यातील नामवंत अशा दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नीला उपचार नाकारण्यात आले. पैशाअभावी रुग्णालयाने उपचार केल्याने या महिलेचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. आमदार अमित गोरखेंनी हा आरोप केला असून यानंतर आता अनेकजण समोर येत आहेत. सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनीही एक्स अकाऊंटवरुन या रुग्णालयासंदर्भातील एक आर्थिक व्यवहाराचा उल्लेख करत पोस्ट केली आहे.
हॉटेलमध्येही जेवण झाल्यावर बिल घेतात पण…
विजय कुंभार यांनी, “दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने आधी पैसे भरले नाहीत म्हणून रुग्णावर उपचार नाकारले. हॉटेलमध्येसुद्धा जेवण झाल्यानंतर बिल घेतात, गाडी दुरूस्त करणारासुद्धा काम झाल्यानंतर बिल घेतो. मात्र खाजगी रुग्णालयामध्ये पेशंटने आधी पैसे भरल्याशिवाय त्याला हात सुद्धा लावला जात नाही. त्याची काही कारणे कदाचित असतीलही परंतू कारणं काहीही असोत असं करणं हे अमानवी आहे एवढं नक्की,” असं म्हटलं आहे.
पैशाअभावी कुणावरही उपचार नाकारले जाणार नाहीत हे पाहण्याची जबाबदारी सरकारची
तसेच विजय कुंभार यांनी आता प्रशासन काय भूमिका घेणार असा सवालही विचारला आहे. “यात शासन आणि पुणे महापालिका प्रशासन यांची काय भूमिका असणार आहे? की मूग गिळून गप्प बसणार आहेत? अशा रुग्णालयांना आतापर्यंत काय आणि किती सवलती दिल्या, किती वेळा कोणत्या कारणांसाठी दंड लावला आणि तो वसूल केला की नाही ? याची श्वेतपत्रिका दोघांनी प्रसिद्ध केली पाहिजे,” अशी मागणी कुंभार यांनी केली आहे. “पैशाअभावी कुणावरही उपचार नाकारले जाणार नाहीत हे पाहण्याची जबाबदारी सरकारची आहे आणि थोडासा दंडुका उगारला तर ते सहज शक्य आहे. सरकारी कुबड्यांशिवाय अशी रुग्णालये श्वासही घेऊ शकत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. फक्त सरकारला रुग्णांची काळजी घ्यायला पाहिजे असे कधी वाटणार एवढाच खरा प्रश्न आहे,” असा टोला विजय कुंभार यांनी लगावला आहे. त्यांनी आपल्या पोस्टच्या शेवटी ‘रुग्णालय_की_दुकान’, ‘सरकारी_सवलतीचा_हिशोब_द्या’, ‘पुणे_महापालिका_जागो’ असे हॅशटॅगही वापरले आहेत.
