इतिहासकार इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देण्याचा आरोप असलेला आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपमानास्पद विधानं करणारा नागपूर येथील पत्रकार प्रशांत कोरटकरसंदर्भात नवनवीन खुलासे रोज समोर येत आहेत. प्रशांत कोरकटरकडे असलेल्या महागड्या रोल्स रॉयसच गूढ अखेर उकललं आहे. प्रशांत कोरटकर जी आलिशान रोल्स रॉयस चालवताना दिसतो ती पिंपरी – चिंचवडमधील बांधकाम व्यवसायिक तुषार कलाटेंकडे असल्याचं समोर आलं आहे.
त्या रोल्स रॉयसचा मालक कोण?
तुषार कलाटे यांच्या मुळशी तालुक्यातील फार्म हाऊसमध्ये कोरटकर चालवत असलेली आलिशान रोल्स रॉयस उभी असल्याचं हाती लागलेल्या व्हिडीओजमधून दिसून येतं आहे. डबल्यूबी – 02 – एबी 123 या क्रमांकांच्या या रोल्स रॉयससोबत तुषार कलाटेचे फोटो देखील समोर आले आहेत. दुसरी महत्वाची बाब म्हणजे प्रशांत कोरटकर आणि तुषार कलाटे यांचा एकत्रित व्हिडीओ ही आहे. या व्हिडिओत प्रशांत कोरटकर आणि तुषार कलाटेसह वादग्रस्त तांत्रिक मनोहर भोसले देखील दिसून येत आहे. मनोहर भोसलेंवर याआधी अघोरी विद्येमार्फत भक्तांना लुबाडल्याचे आणि लैंगिक शोषणाचे गुन्हे दाखल आहेत.
4700 कोटींच्या घोटाळ्याशी कनेक्शन
तुषार कलाटेंनी ही रोल्स रॉयस प्रशांत कोरटकरच्या पोलीस अधिकाऱ्यांसोबत असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधातून मिळवली का हा प्रश्न निर्माण होत आहे. ही रोल्स रॉयस 4700 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप असलेल्या महेश मोतेवारच्या समृद्ध जीवन कंपनीच्या नावावर आहे. प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी अटक केल्यानंतर या रोल्स रॉयसबाबत देखील त्याच्याकडे चौकशी करण्यात आली होती . मात्र त्याने या कारबाबत माहिती देण्यास नकार दिला.
> मात्र छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर कोरटकर फरार झाला.
> त्यानंतर त्याच्याकडे असलेल्या या रोल्स रॉयसच्या विचित्र प्रवासाची खरी माहिती समोर आली आहे.
रोल्स रॉयसचा प्रवास कसा झाला?
> महेश मोतेवारने देशभरातील लाखो गुंतवणूकदारांची चार हजार सातशे कोटी रुपयांची फसवणूक केल्याने त्याला 2015 मध्ये अटक करण्यात आली.
> त्यानंतर मोतेवारच्या हजारो कोटी रुपयांच्या मालमत्तांचा लिलाव होऊन त्यातून येणारे पैसे गुंतवणूकदारांमध्ये वाटले जाणं अपेक्षित होतं.
> मात्र मोतेवारच्या मालमत्ता ताब्यात घेऊन त्यांचा लिलाव करण्याची जबाबदारी असलेल्या सरकारी अधिकाऱ्यांनीच त्याच्या मालमत्ता लुबाडल्याचा आरोप केला गेला.
> सात ते आठ कोटी रुपये किंमत असलेल्या त्याच्या आलिशान रोल्स रॉयस ताब्यात घेऊनही तिचा लिलाव करण्यात आला नाही.
> सी.बी.आय. आणि सी.आय.डी. ने ही गाडी विकता येणार नाही अशी नोटीस 2015 मध्ये दिली होती. मात्र कोरटकरने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत असलेल्या संबंधाचा उपयोग करून ही नोटीस मागे घ्यायला लावली.
> त्यानंतर या गाडीवर कर्ज असल्याचं दाखवून बँकेमार्फत या गाडीचा लिलाव घडवून आणण्यात आला.
> प्रशांत कोरटकरच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधातून ही गाडी तुषार कलाटे यांनी दोन कोटी रुपयांना खरेदी केली.
> त्यानंतर प्रशांत कोरटकरने पुण्यातील रेंज हिल्स भागात ही रोल्स रॉयस चालवली आणि त्याचा व्हिडीओ शूट केला.
