बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी असलेल्या जयराम चाटेच्या जवाबामध्ये आता सुग्रीव कराडच्या नावाचा उल्लेख आला आहे. सुग्रीव कराडच्या सांगण्यावरून सरपंच संतोष देशमुख आणि गावातील लोकांनी सुदर्शन घुले आणि त्याच्या मित्रांना मारहाण केल्याचं जयराम चाटेनं म्हटलं आहे. असं केल्याने वाल्मिक कराडची लोकांमध्ये आणि बीडमध्ये बदनामी झाली. त्यामुळे सुदर्शनला वाल्मिक कराडने या गोष्टीचा बदला घ्यायला सांगितले होते, असं जयराम चाटेने म्हटलं आहे. “हा बदला घेण्यासाठी आज आपण सरपंच संतोष देशमुखला उचलून त्याला चांगली अद्दल घडवायची आहे,” असा संवाद झाल्याचा असा उल्लेख जयराम चाटेच्या जवाबात करण्यात आला आहे.
जयराम चाटेने उल्लेख केलेला कोण आहे सुग्रीव कराड?
सुग्रीव कराड हा केजमधील रहिवासी असून तो देखील गुंड आहे. याआधी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड याच्याबरोब त्याने काम केलं आहे. लोकसभेपर्यंत त्याने खासदार बजरंग सोनवणेंना विरोध केला होता. मात्र आता सुग्रीव कराडने खासदार बजरंग सोनवणे यांचे नेतृत्व मान्य केल्याची चर्चा सुरू आहे. सुग्रीव कराड राजकीय पटलावरील असून त्याने पंचायत समितीत आईला निवडून आणले होते. तर केज नगरपंचायतीच्या वेळी खासदारांच्या मुलीचा पराभव केला होता.
तिन्ही आरोपींचे जबाब नोंदवले
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात तिन्ही आरोपींनी कबुली जबाब नोंदवले आहेत. हे जबाब गोपनीय आहेत. सुदर्शन घुलेला अटक केल्यानंतर त्याने पोलीस कोठडीत संतोष देशमुख यांचे अपहरण करून खून केल्याची कबुली दिल्याचं मान्य केलं आहे. घुलेसह जयराम चाटे, महेश केदार यांनी देखील जबाब दिले आहेत. यात त्यांनी हत्येची कबुली दिली आहे. तर सुदर्शन घुले हाच टोळीप्रमुख असल्याचं सांगण्यात आलं आहे. असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी देखील न्यायालयात केला होता.
कोणत्या आरोपीकडे कोणतं शस्र?
सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करताना कोणत्या आरोपीकडे कोणते शस्त्र होते याची कबुली सुदर्शन घुलेने दिली आहे. सुदर्शन घुले याचा दोषारोपपत्रामधील जबाबात सत्य समोर आले आहे. “उमरी टोल नाक्यावर सरपंचाची गाडी अडवल्यानंतर ड्रायव्हर साईटच्या काचेवर दगड सुधीर सांगळेने मारला. त्यानंतर मी (सुदर्शन घुले) डाव्या बाजूचा दरवाजा उघडून सरपंच देशमुख यांना बाहेर खेचले. त्यावेळी माझ्या (सुदर्शन घुलेच्या) हातात गॅस पाईप होता. त्याने मी मारहाण केली,” असं सुदर्शन घुले म्हणाला आहे. तसेच पुढे त्याने प्रतीक घुलेच्या हातात लाकडी काठी, महेश केदारच्या हातात लोखंडी रॉड होता तर जयराम चाटेच्या हातात कोयता होता असंही घुलेनं सांगितलं. त्याप्रमाणे, कृष्णा आंधळेच्या हातात क्लच वायरचा बंच आणि सुधीर सांगळेच्या हातात पांढऱ्या रंगाचा प्लास्टिकचा पाईप होता अशी कबुली घुलेनं दिली आहे. जयराम चाटेने त्याच्या हातातील कोयत्याने इंडिगो गाडीचा चालक शिवराज देशमुखला धमकावले. तसेच बळजबरीने मारहाण करत स्कार्पिओ गाडीत संतोष देशमुख यांना बसून अपहरण केले. त्यावेळी स्कार्पिओ गाडी सुदर्शन घुले चालवत होता. तर जयराम चाटे हा स्विफ्ट गाडी चालवत होता, असं कोर्टासमोर सांगण्यात आलं आहे.
