आठवड्याभरात 12 लाखांचा गंडा… आयुष्यातील निगेटीव्हिटी घालवण्याच्या नादात IT इंजिनिअर कंगाल

तळहातावर असलेल्या पाच इंचाच्या स्क्रीनवर सारं जग सामावलं आहे, असं हल्लीच्या स्मार्टफोनच्या युगाबद्दल बोलताना सांगितलं जातं. मात्र हीच पाच इंचाची स्क्रीन आता डिजीटल डल्ला मारणाऱ्यांसाठी आयती संधी म्हणून उपलब्ध झाल्याचं अनेक सायबर गुन्ह्यांमधून दिसून येतं. असाच एक विचित्र सायबर गुन्हा मुंबईतील सॉफ्टवेअर इंजिनीअरबाबत घडला आहे. या साऱ्या गोंधळात या तरुणाला तब्बल 12 लाखांचा आर्थिक फटका बसला आहे.

नेमकं या तरुणाने केलं तरी काय?

वांद्रे-कुर्ला संकुलात म्हणजेच बीकेसीमध्ये राहणाऱ्या एका 24 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनीअरची ऑनलाइन फसवणूक झाली आहे. या तरुणाने आपल्या वैयक्तिक समस्यांवर उपाय शोधण्यासाठी ज्योतिषाचा आधार घेण्याचा निर्णय घेतला. मात्र हाच निर्णय त्याच्या अंगलट आला. या तरुणाने ‘डिव्हाइन टॉक’ नावाच्या ऑनलाइन अ‍ॅपवरुन ज्योतिषाचा सल्ला घेतला. मात्र हे अॅप वापरणं त्याला चांगलेच महागत पडलं. या तरुणाचे तब्बल 12 लाख 21 हजार खात्यावरुन गायब झाले. या प्रकरणी मुंबईच्या सायबर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

डाऊनलोड केलेल्या अ‍ॅपवर काय झालं?

या तरुणाने त्याच्या आयुष्यातील नकारात्मकता दूर करण्यासाठी हे अ‍ॅप डाउनलोड केलेलं. या अ‍ॅपवर त्याची ओळख ‘निशांत’ नावाच्या कथित आध्यात्मिक गुरूशी झाली. निशांत नावाच्या या कथित अध्यात्मिक गुरुने या तरुणाला 6300 रुपये खर्चून एक विधी केल्यास तुझ्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतील, असं सांगितलं. या तरुणीने सदर रक्कम भरली, परंतु त्यानंतर फसवणुकीचा सिलसिलाच सुरु झाला.  या तरुणाने आयुष्यावरील कथित संकट टाळण्यासाठी क्रेडिट कार्डचा वापर करून आणि खासगी सावकारांकडून पैसे उधार घेऊन निशांतला एकूण 12 लाख 21 हजार रुपये दिले. विशेष म्हणजे केवळ सहा दिवसांत ही एवढी मोठी रक्कम निशांत नावाच्या व्यक्तीने तरुणाकडून उकळली.

मित्रांशी बोलल्यावर लक्षात आला प्रकार

शेवटी, एवढा पैसा देऊनही समाधानकारक असं काहीच घडत नसल्याने शंका आली म्हणून या तरुणाने मित्रांशी यासंदर्भात चर्चा केली. तेव्हा या तरुणाल आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले आणि त्याने सायबर पोलिसांकडे धाव घेतली. सदर प्रकरणामध्ये आता पोलीस अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *