महापालिकेच्या रोजगार मेळाव्यात ५४० उमेदवारांना मिळाली नोकरी, पात्र उमेदवारांच्या हातात थेट ऑफर लेटर

महानगरपालिकेने कांदिवलीमधील (पूर्व) आकुर्ली येथे उभारलेल्या कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्रात सोमवारी विद्यार्थ्यांच्या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या रोजगार मेळाव्यात १ हजार ४९० उमेदवार नोकरीच्या शोधात आले होते. त्यापैकी पात्र ठरलेल्या ५४० उमेदवारांना नोकरी मिळाली. तसेच, त्यांना जागीच ऑफर लेटर देण्यात आले. या रोजगार मेळाव्यात २८ व्यावसायिक कंपन्या सहभागी झाल्या होत्या. दरम्यान, उपस्थित होतकरू विद्यार्थ्यांना कांदिवली (पूर्व) येथील कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्रात उपलब्ध असलेल्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांची माहिती देण्यात आली.

महानगरपालिकेच्या नियोजन विभागामार्फत सुरू करण्यात आलेल्या कांदिवली येथील कौशल्य विकास केंद्राद्वारे विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणानंतर उपलब्ध असलेले व्यावसायिक शिक्षण आणि नोकरीची संधी याबाबत जनजागृती करण्यात येते. तसेच या ठिकाणी अनेक नामांकित कंपन्यांनी युवक वर्गासाठी प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याअंतर्गत सोमवारी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या रोजगार मेळाव्यात एकूण १ हजार ४९० उमेदवार सहभागी झाले होते. त्यापैकी ५४० उमेदवारांना नोकरीची संधी मिळाली

या कंपन्यांमध्ये संधी

टीम लीस, योमन, जीनीअस, पॉवर पाईंट, ॲक्सिस, पॉलिसी बॉस्, आय करिअर, अदानी आदी २८ व्यावसायिक कंपन्या या मेळाव्यात सहभागी झाल्या होत्या. तसेच, पात्र उमेदवारांना तात्काळ स्वीकार पत्र (ऑफर लेटर) देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *