पंढरीत लवकरच संत नामदेव स्मारक, स्मारकासाठी रेल्वेची जागा उपलब्ध

पंढरपुरात संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या स्मारक उभारणीचा प्रश्न मार्गी लागत असून पंढरपुरात रेल्वेच्या मालकीची १६ एकर जागा मिळाली आहे. त्यापैकी काही जागा संत नामदेव महाराजांच्या स्मारकासाठी मिळणार आहे. या स्मारकासाठी सुमारे २५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी ही माहिती दिली.पंढरपुरातील रेल्वेच्या १६ एकर जागेच्या मोबदल्यात राज्य शासनाकडून पालघर येथील जागा रेल्वेला देण्याचे ठरविले आहे.

२०१४ पासून पंढरपुरात संत नामदेव स्मारक उभारण्याचा प्रयत्न सुरू होता. सुरुवातीला या स्मारकाच्या उभारणीसाठी सुमारे १५ कोटी रुपये खर्च गृहीत धरण्यात आला होता. परंतु जागा उपलब्ध होत नसल्यामुळे स्मारक उभारण्याचा प्रश्न मार्गी लागत नव्हता. पंढरपुरात रेल्वेच्या मालकीची मुबलक जागा आहे. त्यापैकी काही जागा उपलब्ध होण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न चालविले होते. अखेर त्यास यश आले आहे. रेल्वेच्या मालकीची १६ एकर जागा राज्य सरकारला मिळाली आहे. त्या मोबदल्यात रेल्वेला पालघर येथील जागा राज्य सरकारने देण्याचे निश्चित केले आहे. पंढरपुरात रेल्वेकडून मिळालेल्या जागेपैकी काही जागा संत नामदेव महाराजांच्या स्मारकासाठी उपलब्ध होणार असल्याचे आशीर्वाद यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *