दगडावर बसून समुद्राकडे पाहत बसलेल्या, हरिहरेश्वर किनारी ठाण्यातील अधिकारी महिलेचा मृत्यू नेमका कसा झाला?

कोकणातील ‘दक्षिण काशी’ अशी ओळख असलेल्या हरिहरेश्वर येथील समुद्रात बुडून ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या स्वीय सहाय्यक पल्लवी सरोदे  यांचा मृत्यू झाला. सरोदेंच्या अकाली एक्झिटने ठाणे महसूल विभागावर शोककळा पसरली आहे. दगडावर बसून समुद्राकडे पाहत असताना एका मोठ्या लाटेसह त्या पाण्यात ओढल्या गेल्या.

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील सहाय्यक महसूल अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्या स्वीय सहाय्यक या पदावर कार्यरत असलेल्या ३७ वर्षीय पल्लवी सरोदे (वय ३७ वर्ष) यांचे रविवारी सकाळी हरिहरेश्वर समुद्र किनाऱ्यावर अपघाती निधन झाले. ऑफिसमधील मैत्रिणींसोबत त्या हरिहरेश्वरला सहलीसाठी गेल्या होत्या. समुद्रकिनारी त्या लाटेत अचानक ओढल्या गेल्या, यातच त्यांचा मृत्यू झाला. ही दुर्घटना ठाणे जिल्हा प्रशासनातील सर्वांच्याच मनाला चटका लावून गेली.

शनिवारी मंदिर परिसर फिरुन झाल्यावर सर्व महिला कर्मचारी रविवारी सकाळी मंदिरात पुन्हा दर्शनाला गेल्या होत्या. त्यानंतर त्या समुद्राची प्रदक्षिणा मारण्यासाठी निघाल्या. इतर कर्मचारी प्रदक्षिणा मारत असताना पल्लवी सरोदे मात्र समुद्र किनारी असणाऱ्या दगडावर बसून समुद्राकडे पाहत बसल्या होत्या.
पाच ते आठ फूट उंच उसळणाऱ्या लाटांबरोबर सेल्फी घेण्याचा मोह पल्लवी यांना झाल्याचे बोलले जाते. काही जणींनी पल्लवींना यांना काळजी घेण्याचा सल्ला दिला. तसंच भरती असल्यामुळे आत येण्यासही सांगितलं, मात्र मैत्रिणींच्या सूचनेकडे दुर्लक्ष करणं पल्लवी सरोदेंच्या जीवावर बेतल्याचे दिसते.

पल्लवी सरोदे या ठाणे जिल्हा प्रशासनात २०१२ मध्ये लिपिक पदावर रुजू झाल्या होत्या. मार्च २०२४ मध्ये त्यांना सहाय्यक महसूल अधिकारी पदावर पदोन्नती मिळाली होती. त्या सध्या जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या स्वीय सहाय्यक म्हणून कार्यरत होत्या. त्यांच्या पश्चात पती, सासू- सासरे आणि मुलगा असा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *