काश्मीरमध्ये चकमकीत लष्करचा १ दहशतवादी ठार

जम्मू-काश्मीरमधील कूपवाडा येथे दहशतवादी व सुरक्षा दलाच्या जवानांदरम्यान झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तय्यबाचा एक दहशतवादी ठार झाल्याचे वृत्त आहे. अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार,  उत्तर काश्मीरमधील लोलाब येथील घनदाट जंगलात काही दहशतवादी मोठा शस्त्रसाठा घेऊन लपल्याची खबर रविवारी रात्रीच्या सुमारास सुरक्षा दलाच्या जवानांना मिळाली. त्यानंतर त्यांनी शोधमोहिम सुरू केली असता दहशतवाद्यांनी जोरदार गोळीबार केला, जवानांनी त्यांना चोख प्रत्युत्तर देत एक दहशतवाद्याला कंठस्नान घातले. ही चकमक अद्याप सुरूच असून दहशवाद्यांचा नेमका आकडा समजू शकलेला नाही.
दरम्यान रविवारी सुरक्षा दलाच्या जवानांनी त्राल येथील एन्काऊंटरदरम्यान जैश- ए-मोहम्मद संघटनेच्या दोन अतिरेक्यांना कंठस्नान घातले होते. दोन्ही दहशतवादी पुलवामा जिल्ह्यातील हारी गावात लपले होते. अनके तास चाललेल्या या धमश्चक्रीत अखेर दोन्ही दहशतवाद्यांना ठार करण्यात जवानांना यश मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *