तरुण वयात हृदय विकाराच्या झटक्यानं होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमामात वाढलं आहे. नाशिकच्या लासलगावात अशीच एक घटना घडली आहे. अवघ्या २८ वर्षांच्या तरुणीला झोपेतच हृदय विकाराचा झटका आला. त्यामुळे तिची प्राणज्योत मालवली. तिच्या शवविच्छेदन अहवालातून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
लासलगावच्या टाकळी विंचूरमध्ये राहणाऱ्या कल्याण मोकाटेचा झोपेतच मृत्यू झाला. कल्याणी रात्री नेहमीप्रमाणे तिच्या खोलीत झोपली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी ती उठलीच नाही. घरच्या मंडळींनी तिला झोपेतून उठवण्याचा प्रयत्न केला. पण तिनं कोणताच प्रतिसाद दिला नाही. कल्याणी कोणतीच हालचाल करत नव्हती. त्यामुळे कुटुंबियांना चिंता वाटू लागली. त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.
कुटुबियांनी कल्याणीला तातडीनं जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केलं. त्यामुळे कुटुंबियांसह शेजाऱ्यांना धक्काच बसला. टाकळी विंचूरमध्ये राहणाऱ्या कल्याणीच्या मृत्यूचं नेमकं कारण शोधण्यासाठी शवविच्छेदन करण्यात आलं. त्यातून धक्कादायक उलगडा झाला.
