आतापर्यंत तुम्ही क्रिकेटच्या मैदानात धावताना किंवा दम लागल्याने अथवा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याच्या बातम्या वाचल्या किंवा ऐकल्या असतील. अशा घटनांचे व्हिडीओही यापूर्वी व्हायरल झाले आहेत. मात्र नुकत्याच घडलेल्या एका विचित्र घटनेमध्ये क्रिकेटच्या मैदानावर चक्क उष्णता सहन न झाल्याने एका क्रिकेटपटूने मैदानातच प्राण सोडला. मरण पावलेला क्रिकेटपटू पाकिस्तानी वंशाचा आहे.
नक्की हा क्रिकेटपटू कोण आणि घडलं काय?
मिळालेल्या माहितीनुसार, मयत तरुणाचं नाव जुनैद जाफर खान असं असून तो क्रिकेटच्या मैदानामध्ये खेळपट्टीवरच चक्कर येऊन पडला. शनिवारी तापमान 41.7 अंश सेल्सिअस असताना खेळवल्या जात असलेल्या क्रिकेट सामन्यादरम्यान हा सारा प्रकार घडला. ऑस्ट्रेलियातील ‘द ओल्ड कॉनकोर्डियन्स क्रिकेट क्लब’कडून जुनैद खेळायचा. शनिवारच्या या सामन्यात जुनैदने आधी 40 ओव्हर मैदानात फिल्डींग केली होती. त्यानंतर त्याने प्रिन्स अल्पेड ओल्ड कॉलेजियन्सच्या संघाविरुद्ध नाबाद 16 धावा केल्या.
अॅडलेडमधील कॉनकोर्डियन्स कॉलेजच्या मैदानावर झालेला हा सामना संपल्यानंतर जुनैद मैदानावरच कोसळला. स्थानिक वेळेनुसार तो दुपारी चारच्या सुमारास मैदानात कोसळल्यानंतर मैदानावरच रुग्णावाहिका बोलावण्यात आली. मात्र त्याला रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याने मैदानात प्राण सोडले. ‘न्यूज डॉट कॉम डॉट एयू’ने दिलेल्या वृत्तानुसार, जुनैद हा पाकिस्तानमधून 2013 साली ऑस्ट्रेलियात स्थायिक झाला होता. तो माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करायचा.
