आतापर्यंत तुम्ही फसवणुकीचे अनेक प्रकार पाहिले असतील किंवा ऐकले असतील. कशा प्रकारे हे घोटाळेबाज एखाद्या व्यक्तीची फसवणूक करून त्यांच्याकडून पैसे काढून घेतात. अनेक गरीब या फसवणूकीचे बळी जातात. त्या घोटाळेबाजला कोणत्याही व्यक्तीच्या भावनांशी कसं खेळायचं आणि सगळे पैसे काढून घ्यायचे हे कळतं. पण आता अशी एक घटना घडली आहे ती ऐकल्यावर तुम्हीही म्हणाल शेरास सव्वाशेर भेटला. चक्क एका सर्वसामान्य व्यक्तीनं या घोटाळेबाजची फसवणूक केली आणि इतकंच नाही तर त्याच्याकडून तब्बल 10 हजार रुपये देखील काढून घेतले. त्यानंतर जेव्हा घोटाळेबाजला कळलं की त्याचीच फसवणूक करण्यात आली आहे तर तो पैसे परत कर यासाठी विनंती करत आहे.
नेमकं काय घडलं?
कानपुरमधील एका तरुणानं घोटाळेबाजचीच फसवणूक केली आहे. इतकंच नाही तर स्कॅमरकडून स्वत: च्या अकाऊंटला 10 हजार रुपये ट्रान्सफर करून घेतले. आता हा सगळा प्रसंग कसा घडला नेमकं काय झालं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. एका घोटाळेबाजनं भुपेंद्र सिंह नावाच्या व्यक्तीला CBI ऑफिसर असल्याचं सांगत फोन केला. त्याशिवाय त्यानं भुपेंद्रला सांगितलं की त्याचा एक अश्लील व्हिडीओ हा आपल्याकडे आहे. तो इथेच थांबला नाही तर त्यानं सांगितलं की यावर काही कारवाई होऊ नये किंवा तक्रार दाखल होऊ नये असं वाटत असेल तर लाच द्यावी लागेल. लाच न दिसल्यास लगेच तक्रार दाखल होईल. हे ऐकताच भुपेंद्रनं एक शक्कल लगावली.
भुपेंद्रनं घाबरल्याचं नाटक करत सांगितलं काका, कृपया माझ्या आईला याविषयी काही सांगू नका नाही तर मी अडचणीत अडकेन. त्यावरून त्या घोटाळेबाजनं 16000 रुपयांची मागणी केली. हे पाहता भुपेंद्रनं त्याचीच फसवणूक करण्यासाठी त्याला काही वेगळंच कारण सांगत म्हणाला, त्याच्याकडे एक सोन्याची चेन आहे ती त्यानं गहाण ठेवली असून ती सोडवण्यासाठी त्याला 3000 रुपये हवे आहे. तेच पैसे मिळत नाही आहे, ते जर चेन मिळवली तर मी तुम्हाला पैसे देईन. हे ऐकताच घोटाळेबाजनं भुपेंद्रला 3000 रुपये ट्रान्सफर केले.
काहीच दिवसात त्या घोटाळेबाजनं पुन्हा फोन केला आणि भुपेंद्रनं यावेळी दुसरं कारण सांगितलं. तो म्हणाला की सोनारानं चेन देण्यास नकार दिला आहे आणि भुपेंद्र हा अजून लहान असल्यानं सोनार नकार देत असल्याचं त्यानं म्हटलं. आता या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी म्हणजे सोन्याचे चेन मिळवण्यासाठी घोटाळखोरानं भुपेंद्रचे वडील असल्याचं सांगत सोनाराशी बोलणं केलं. त्यावेळी सोनारानं असं काही सांगितलं की घोटाळखोरानं पुन्हा एकदा 4480 रुपये भुपेंद्रला पाठवले.
घोटाळखोरानं पुन्हा एकदा भुपेंद्रशी संपर्क केला. भुपेंद्रनं यावेळी पुन्हा एकदा मित्राची मदत घेतली आणि सांगितलं की पुन्हा जर चेन ही गहाण ठेवली तर 1.10 लाख रुपये कर्ज मिळू शकते. पण त्यासाठी देखील 3000 रुपये लागतील. अजूनही घोटाळेखोराला कळलं नाही की हे सगळं खोटं आहे आणि त्यानं पुन्हा एकदा 3000 रुपये भुपेंद्रला ट्रान्सफर केले. दरम्यान, भुपेंद्रनं त्या घोटाळखोराकडून तब्बल 10000 रुपये काढून घेतले. थोडक्यात त्यानं घोटाळखोराचीच फसवणूक केली. जेव्हा स्कॅमरला कळलं की त्याचीच फसणवूक करण्यात आली आहे तेव्हा तो भुपेंद्रला विनवणी करू लागला की मला माझे 1000 रुपये परत द्या. भुपेंद्रनं या संपूर्ण प्रकरणाची माहिती देत पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे आणि हे देखील सांगितलं की मिळवलेले सगळे पैसे हे तो एका गरजूला देईल.
