मासे खाणा-यांनो सावधान! मासे खाताना काटा अडकल्यानं एका खवय्याला रुग्णालयात दाखल होण्याची वेळ आली होती. सुरुवातीला घशात अडकलेला काटा अन्ननलिकेत अडकल्यानं डॉक्टरांना थेट ऑपरेशन करण्याची वेळ आली.
चमचमीत मासे खाणे कुणाला आवडत नाही. मासे खाणा-यांचा एक पंथच आहे म्हणाना. पण हाच चवदार मासा एका खवय्याच्या जीवावर उठल्याची घटना संभाजीनगरमध्ये घडली आहे. संभाजीनगरमध्ये मासा खाताना त्याचा काटा एका व्यक्तीच्या घशात अडकला. सुरुवातीला घशात अडकलेला काटा पुढं अन्ननलिकेत जाऊन अडकून राहिला. मासे खाणा-याला अडकलेला काटा त्रासदायक ठरु लागला. त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं.
तिथंही अडचण होतीच, तो काटा सिटी स्कॅनमध्ये दिसत नव्हता. त्यामुळं तो काटा काढण्याचं आव्हान डॉक्टरांसमोर होतं. पण शेवटी डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करुन काटा बाहेर काढला.
काट्याशिवाय मासा खाण्यात मजा नाही असं खवय्ये सांगतात. पण या प्रकरणात माशातील काट्यामुळं जीवच पणाला लागला होता. त्यामुळं माशांवर कितीही प्रेम असलं तरी मासे खाताना काट्याबाबत थोडं सावध राहा.
