एअरटेल गॅलरीत महिला कर्मचाऱ्याने मराठी बोलण्यास नकार देत तरुणाशी वाद घातल्यानंतर पुन्हा एकदा भाषेचा मुद्दा तापला आहे. अंधेरीतील चारकोप येथे एअरटेलच्या गॅलरीत महिला कर्मचाऱ्याने मराठी तरुणाशी वाद घालताना आपण मराठीत बोलणार नाही अशी मुजोरी दाखवली. तरुणाने मोबाईलमध्ये हा सगळा प्रकार कैद केल्यानंतर व्हिडीओ व्हायरल झाला. यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे राज्य संघटक अखिल चित्रे यांनी एअरटेल प्रशासनाची भेट घेत मराठीवर असा भेदभाव केला तर यापुढे एकही गॅलरी दिसणार नाही असा इशारा दिला आहे.
एअरटेलच्या गॅलरीत आणि कॉलिंग यात मराठी पर्याय ठेवायला काही समस्या आहे का? मग नेमकी काय समस्या आहे की, एअरटेलच्या गॅलरीत मराठी बोलणारे तरुण किंवा तरुणी नसतात. यामागे काही तरी कारण आहे का? अशी विचारणा अखिल चित्रे यांनी एअरटेलच्या अधिकाऱ्याला केली. त्यावर संबंधित एअरटेलचा अधिकारी मराठी मुलं नाहीत असं नाही असं उत्तर देतो. त्यावर अखिल चित्रे त्यांना काल जो प्रकार घडला त्याची आठवण करुन देतात.
