व्यवसाय पिढीजातच असतो, असे नव्हे हे दाखवून देणारे हे उदाहरण महिलांसाठी प्रेरणादायी ठरावे. खेडेगावात संसार आणि मग पतीच्या एक छोट्या नोकरी निमित्त परत खेडेवजा गावात सेलूत स्थलांतर. इथेच संगीता प्रवीण पुसदकर यांची कसोटी लागली. पतीची नोकरी करोना संकटात गेली. उत्पन्नाचे दुसरे साधन नाही. दोन वेळच्या जेवणाची परीक्षाच लागलेली. अश्या वेळी करायचे काय म्हणून मग गावातील सिद्धेश्वर बचत गट मदतीस आला.त्यांनी दहा हजार रुपयाची मदत केली. त्यातून श्वेत मसाले नावाने व्यवसाय सूरू केला. याच गटाच्या माध्यमातूम जिल्हा परिषदेच्या उमेद अभियानाची माहिती संगीताताई यांना मिळाली.
उमेदमुळे मग मदत, मार्गदर्शन व मानसिक आधार मिळाला. परत मागे वळून पाहण्याची गरज पडली नाही. एक किरायाच्या छोटया खोलीत निवास व तिथेच हा मसाले व्यवसाय सूरू झाला.डोळ्यातील अश्रू एकदाचे थांबले. उमेद माध्यमातूम मग विक्रीचे स्टॉल लावण्यास संधी मिळाली. मसाले, मिरची, हळद कांडून त्याची विक्री सूरू केली. व्यवसायात पैसे कमी पडू लागले म्हणून स्टेट बँकेचे कर्ज उमेद माध्यमातून मिळाले. अडीच लाख रुपयात कांडप मशीन विकत घेतली. विक्री वाढली. पॅकेजिंग, पाउच मशीन व सोबतच ब्रँडिंगचे साहित्य विकत घेतले. लाखोची उलाढाल म्हणून मग संगीताताई लखपती दिदी म्हणून सन्मानित झाल्या. आता भाड्याचे घर अपुरे ठरू लागले. उदयोग पण वाढवायचा म्हणून जागा विकत घेत घर बांधले. कारखाना उभा केला. पतीचे सहकार्य मोलाचे पण त्यांनाच विक्री व अन्य कामाचा भार पडू लागल्याने इतर कामाचे हात आवश्यक ठरले. चार महिला सोबतीस घेतल्या आणि उत्पादन वेग वाढू लागला. खेड्यातील पडक्या घरातून ते सेलूच्या किरायाच्या खोलीतील पुसदकर परिवार दोन मजली घरात अवघ्या तीन वर्षात पोहचला.
