पूर्व उपनगरात महापालिकेचे आणखी एक नवीन रुग्णालय लवकरच उपलब्ध होणार आहे. एमएमआरडीएने बांधलेले ४१० खाटांचे हे रुग्णालय मुंबई महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात आले असून मल्टी स्पेशालिटी लल्लूभाई कंपाऊंड रुग्णालय ३० वर्षे चालवण्यासाठी खासगी संस्थेला देण्यात येणार आहे. त्याकरीता पालिकेने निविदा मागवल्या असून त्याकरीता पालिका ११ कोटी खर्च करणार आहे.
परवडणाऱ्या आरोग्य सुविधा देण्यासाठी येत्या काळात सार्वजनिक खाजगी भागिदारी (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) धोरण अवलंबण्याचे मुंबई महापालिकेने ठरवले आहे. पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी याबाबतची घोषणा आगामी अर्थसंकल्पात केली आहे. या धोरणाला आधीच शिवसेना (ठाकरे) प्रणित कामगार सेनेने विरोध दर्शवला आहे. मात्र पालिका प्रशासन आपल्या धोरणावर ठाम असून पालिकेच्या आरोग्य विभागाने एम पूर्व विभागातील मानखुर्दमधील लल्लूभाई अमीचंद कंपाऊंड येथील नवीन रुग्णालय चालवण्यासाठी व व्यवस्थापनासाठी इच्छुक संस्थांकडून प्रस्ताव मागवले आहेत.
