हरियाणाच्या रोहतकमधील सांपला कस्बा बस स्थानकाजवळ 1 मार्चला निळ्या रंगाची बेवारस सुटकेस पडली होती. लोकांची नजर बॅगेवर पडल्यानंतर त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत बॅग उघडून पाहिलं असता त्यात चक्क एका तरुणीचा मृतदेह होता. धक्कादायक म्हणजे हा मृतदेह दुसऱ्या तिसऱ्या कोणाचा नव्हे तर काँग्रेस नेता हिमानी नरवालचा होता.
हिमानी नरवाल तीच काँग्रेस कार्यकर्ता आहे, जिचा भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींसोबतचा फोटो व्हायरल झाला होता. हिमानी रोहतकमध्ये भारत जोडो यात्रेत सहभागी झाली आणि श्रीनगरपर्यंत गेली होती.
आतापर्यंतच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, हिमानीची हत्या करुन तिचा मृतदेह सुटकेसमध्ये भरुन फेकून देण्यात आला. पण पोलिसांना अद्याप मारेकऱ्यांची माहिती मिळालेली नाही. हिमानीच्या आईने यावर बोलताना सांगितलं की, “अनेक लोक माझ्या मुलीबद्दल मनात राग धरुन होते. इतक्या कमी वयात ती इतकी यशस्वी कशी झाली हे अनेकांना रुचत नव्हतं”. त्यांनी मुलीच्या हत्येमागे पक्षातील एखाद्या सदस्याचा हात असू शकतो अशी शक्यताही बोलून दाखवली आहे.
“माझ्या मुलीला न्याय मिळायला हवा. माझी मुलगी वयाने लहान होती आणि कमी वयात तिने अनेक धोके पत्करले होते,” असं हिमानीच्या आईने म्हटलं आहे. दरम्यान या हत्येमागे नेमकं कोण असू शकतं? असं विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की, “मी तसं कोणाला ओळखत नाही. पण पक्षाचे अनेक लोक आमच्या घरी येत असत. अशात यामागे कोणाचाही हात असू शकतो. माझी सरकार आणि प्रशासनाला मुलीला न्याय मिळवून द्यावा अशी विनंती आहे”.
28 फेब्रुवारीपासून फोन बंद
हिमानीच्या आईने सांगितलं की, “मी 2 फेब्रुवारीला दुपारी 4 वाजेपर्यंत मुलीसोबत होती. यानंतर मी घरी गेलो होती. 28 तारखेला फोन केला तेव्हा बंद होता. काठमंडी येथील एका कार्यक्रमात हुड्डा येणार होते. तिला त्या कार्यक्रमात जायचं होतं. माझी मुलगी गेल्या 10 वर्षांपासून काँग्रेसशी जोडलेली आहे. माझ्या मुलीला स्वच्छ राजकारण करायचं होतं. अनेकदा काँग्रेसच्या मोठ्या कार्यकर्त्यांसह तिचा वादही झाला होता. तिला तडजोड करण्यासही सांगितलं जायचं. पण माझी मुलगी जे योग्य असेल तेच करणार असं सांगायची. यामुळे अनेकजण तिच्या विरोधात होते”.
काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांशी तुमचं बोलणं झालं का? असं विचारलं असता त्यांनी सांगितलं, “हुड्डा यांच्याशी माझं बोलणं झालं. माझ्या मुलीला न्याय द्यावा इतकीच माझी मागणी आहे. मारेकऱ्यांना मृत्यूडंद व्हावा अशी माझी इच्छा आहे. माझ्या मुलीच्या हत्येत कोणीही सामील असू शकतं, कारण हे फार मोठं सर्कल होतं”.
पोलिसांच्या 5 टीम
हिमानी नरवालच्या हत्येचा तपास करण्यासाठी पोलिसांच्या 5 टीम गठीत करण्यात आल्या आहेत. हिमानीच्या घऱाच्या आसपास लावण्यात आलेले सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडून तपासलं जात आहे. यासह सायबर टीम तिच्या सोशल मीडिया अकाऊंटची पडताळणी करत आहे. सोशल मीडियावर काही संशयास्पद हालचाली दिसत आहेत का याकडे त्यांच लक्ष आहे. पण जिथे सुटकेस सापडली तिथे एकही सीसीटीव्ही नसल्याने पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे.
कोण होती हिमानी नरवाल?
हिमानी नरवाल ही एक सक्रिय काँग्रेस कार्यकर्ता होती. पक्षाच्या प्रत्येक मोठ्या कार्यक्रमात ती उपस्थित असे. राहुल गांधींच्या ‘भारत जोडो यात्रे’शीही जोडली गेली होती. आमदार बीबी बत्रा यांनी तिच्या हत्येची पुष्टी केली आणि सांगितले की हिमानी काँग्रेसची एक कष्टाळू कार्यकर्ता होती. हिमानीची हत्या ही एक गंभीर बाब आहे आणि त्याची चौकशी एसआयटीकडून झाली पाहिजे.
