आरे परिसरात काँक्रीटच्या रस्त्यांवर पुन्हा खोदकाम

आरे मार्गावरील मॉडर्न बेकरी बसथांबा ते आरे रुग्णालय या परिसरातील रस्त्याचे काँक्रीटीकरण सुरू आहे. मात्र, काही भागात काँक्रीटीकरण केलेल्या रस्त्यावर पुन्हा खड्डे खोदण्यात आले. आता या खड्ड्यांवर मातीचा भराव टकल्यामुळे परिसरात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. तसेच वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत आहे.

खड्डेमुक्त मुंबईचे उद्दिष्ट ठेवून महानगरपालिका प्रशासनाने मुंबईतील रस्त्याचे कॉंक्रीटीकरण करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, कॉंक्रीटीकरण केलेल्या रस्त्यांवरील काही भागात पुन्हा खोदकाम केले जात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. आरे मार्गावरही अनेक ठिकाणी काँक्रीाटीकरण झालेल्या रस्त्यावर पुन्हा खोदकाम करण्यात आले होते. खोदलेल्या खड्ड्यांमध्ये मातीने भराव टाकण्यात येत आहे. यामुळे परिसरात धुळीचे साम्राज्य पसरत आहे. तसेच प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

कॉंक्रीटीकरण केल्यानंतर रस्त्यावर तडे कसे जातात, असा सवाल रहिवाशांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, मुंबईकरांना रुंद, खड्डेमुक्त आणि दर्जेदार रस्त्यांच्या माध्यमातून वेगवान प्रवासाची अनुभूती मिळावी, यासाठी पालिका प्रशासनाने मुंबईतील संपूर्ण रस्त्यांचे कॉंक्रीटीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. काही महिन्यांपूर्वी आरेमधील रस्त्यांचे कॉंक्रीटीकरण झाल्यामुळे संबंधित भागातील रहिवाशांना दिलासा मिळाला होता. मात्र, पुन्हा कॉंक्रीटीकरण झालेल्या रस्त्यांवर खोदकाम करण्यात आल्यामुळे रहिवासी संतप्त झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *