ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील ५२ शिक्षकांना पदोन्नती देण्यात आली आहे. यामध्ये ११ केंद्र प्रमुख आणि मुख्याध्यापकांना विस्तार अधिकारी (शिक्षण) पदावर बढती मिळाली आहे तर, ४१ शिक्षकांना मुख्याध्यापक पदावर बढती मिळाली आहे. यामुळे पदोन्नती मिळालेल्या शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
ठाणे जिल्हा परिषदेच्या १ ली ते आठवी पर्यंतच्या एकूण १ हजार ३७९ शाळा आहेत. या शाळांमध्ये ७० हजारहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळांमधील शिक्षकांची अनेक पदे रिक्त असल्याची बाब मध्यंतरी ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत समोर आली होती. असे असले तरी अनेक शिक्षक हे पदोन्नतीच्या प्रतिक्षेत होते. जिल्हा परिषद शिक्षण विभागातील ५२ शिक्षक पदोन्नतीसाठी पात्र ठरले होते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून त्यांना पदोन्नती देण्यात आली नव्हती. या शिक्षकांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली शिक्षण विभागाने नुकतीच पदोन्नती दिली आहे. यामुळे पदोन्नती झालेल्या शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
