चिकन विक्रेता बीफ विकत असल्याचा संशय या जमावाला होता. त्यातून २५ ते ३० लोकांच्या जमावाने चिकनच्या दुकानाची तोड फोड करत चिकन विक्रेत्याला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना पुण्यातल्या काळेपडळ परिसरात घडली असून याप्रकरणी पोलिसांनी ३० लोकांवर गुन्हा दाखल केला आहे. नेमकी ही अफवा कोणी पसरवली याचा शोध सध्या पोलीस घेत आहे. सोबतच दुकानात कोणताही बीफ संबंधी वस्तू आढळून आली आहे का, याचाही शोध पोलिस घेत आहेत.
याप्रकरणी हल्ला झालेले चिकन विक्रेते अली अहमद बबन आणि त्यांचा विक्रेता साथीदार याने काळेपडळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, पोलिसानी २५ ते ३० लोकांवर गुन्हा दाखल केला आहे. सध्या पुढील तपास सुरु असल्याची माहिती आहे.
बीफ विकत असल्याची अफवा आणि जमावाकडून दुकानाची तोडफोड
या प्रकरणात बाबत अधिक माहिती अशी आहे की, मुहम्मदवाडी परिसरात कृष्णा नगर या ठिकाणी एक चिकन विक्रेता गेल्या दहा ते बारा वर्षांपासून परिसरातील अनेक हॉटेल व्यवसायिकांना चिकन होलसेल सप्लाय करतो. चिकन सोडून आपण कोणत्याही ही प्रकारच्या मटणाची विक्री केली नसल्याचा दावा त्याने केला होता. या दरम्यान कोणी तरी अफवा पसरवली की या चिकनच्या दुकानात बीफची विक्री होत आहे.
त्यामुळे काल (९ फेब्रुवारी) रात्रीच्या दरम्यान आचानक २५ ते ३० लोकांचा जमाव एकत्र या चिकन दुकानावर चालून आला, त्यांनी दुकानाची तोड फोड सुरू केली. दुकाच्या काचा फोडल्या, वस्तू तोडल्या सर्व सामान उध्वस्त केलं. त्यानंतर या जमावाने त्या विक्रेत्यालाही बेदम मारहाण केली. बीफ विकत असल्याच्या संशयातूनच हा सगळा प्रकार घडल्याची माहिती आहे. याप्रकरणी विक्रेता अली अहमद बबन आणि त्यांचा विक्रेता साथीदार यांनी काळेपडळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. आज जमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.
