एकीकडे मराठी पंधवडा दिवस साजरा होत असतानाच, दुसरीकडे शहरात वाचकांची भूक भागवणारे मराठी ग्रंथ संग्रहालयाचे ग्रंथयान बंद होण्याच्या मार्गावर आहे. देखभालीचा खर्च परवडत नसल्यासह ग्रंथयानाला पूर्णवेळ चालक उपलब्ध होत नाहिये, त्यामुळे हे ग्रंथयान बंद करण्याचा निर्णय मराठी ग्रंथ संग्रहालयाने घेतला आहे. परंतू, वाचकांची गैरसोय होऊ नये यादृष्टीने पर्यायी म्हणून घरपोच पुस्तके सेवा उपलब्ध केली जाणार आहे. या घरपोच सेवेत जोपर्यंत पूर्णपणे वाचकांची नोंदणी होत नाही, तोपर्यंत ग्रंथयान बंद करण्याच्या निर्णयाला पूर्णविराम दिला जाणार नाही, असा दावा मराठी ग्रंथ संग्रहालय व्यवस्थापनाने केला आहे.
राज्यात प्रथमच ठाणे मराठी ग्रंथ संग्रहालयाने ११ वर्षांपूर्वी हे ग्रंथयान सुरु केले होते. या अनोख्या फिरत्या ग्रंथालयाच्या संकल्पनेला राज्यात पसंती मिळाली होती. ठाण्यातील कोपरी, तीन हात नाका, शिवाईनगर, कचराळी तलाव, लुईसवाडी, लोकमान्य नगर, पोखरण क्र. २, घोडबंदर रोडवरील मानपाडा, पातलीपाडा, ब्रह्रांड, हिरानंदानी इस्टेट, वसंत विहार, पवार नगर, कॅसल मिल, बाळकूम, खारेगाव, कोलशेत, माजिवडा आदी भागात ग्रंथयानाद्वारे वाचकांना पुस्तके उपलब्ध होत होती. ठाणे शहराचा विस्तार होत असतानाच, शहराच्या कानाकोपऱ्यात वास्तव्य करणाऱ्या मराठी ग्रंथप्रेमी वाचकांसाठी ग्रंथयान सेवा ही पर्वणी लाभली होती. या ग्रंथयानाचे ठाणे शहरात ३५० हून अधिक सदस्य होते.
