भारतीय क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईच्या वानखेडे स्टेडियमने पन्नाशी गाठली. या निमित्त वानखेडे स्टेडियमवर आठवठाभराचा सोहळा आयोजित केला आहे. दरम्यान मुंबई क्रिकेट असोसिएशनने बुधवारी (१५ जानेवारी) लिटल मास्टर सुनील गावस्कर आणि फारूक इंजिनियरसह मुंबईच्या आठ माजी खेळाडूंचा गौरव केला. त्यांना प्रत्येकी १० लाख रुपयांचे बक्षीस देण्यात आले. हे आठ खेळाडूं १९७४-१९७५ मधील हंगामात वानखेडे स्टेडियमवर झालेल्या पहिल्या प्रथम श्रेणी सामन्याचा भाग होते.
पहिले जेतेपद पटकावणाऱ्या मुंबई संघातील हे आठ सदस्य म्हणजे सुनील गावस्कर, करसन घावरी, पद्माकर शिवलकर, फारुख इंजिनियर, अजित पै, मिलिंद रेगे, अब्दुल इस्माईल आणि राकेश टंडन. या आठ खेळाडूंपैकी शिवलकर, घावरी, पै, रेगे आणि इस्माईल हे पाच खेळाडू या स्पर्धेदरम्यान उपस्थित होते. वानखेडेवर पहिला प्रथम श्रेणी सामना खेळलेल्या मुंबई संघाच्या सदस्यांचा सत्कार करण्यासाठी आयोजित कार्यक्रमादरम्यान एमसीएचे सचिव अभय हरप यांनी ही घोषणा केली.
