नीलकमल बोट अपघात : बोटीतील बेपत्ता मुलाचा मृतदेह सापडला, मृतांचा आकडा १५

गेट वे ऑफ इंडिया’ येथून घारापुरीकडे निघालेल्या प्रवासी बोटीला नौदलाच्या स्पीड बोटीने धडक दिल्यानंतर बेपत्ता असलेल्या ७ वर्षांच्या मुलाचा मृतदेह शनिवारी शोधमोहिमेत सापडला. त्यामुळे या अपघातातील मृतांची संख्या १५ वर पोहोचली आहे. याप्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यात नौदलाच्या स्पीड बोटीचा चालक आणि इतर संबंधित व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निष्काळजीपणामुळे १५ जणांच्या मृत्यूला कारभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

‘नीलकमल’ ही प्रवासी बोट पर्यटक आणि प्रवाशांना घेऊन घारापुरीकडे जात होती. दुपारी ३.५५ वाजता नौदलाच्या एका ‘स्पीड बोटी’ने प्रवासी बोटीला उजव्या बाजूने जोरदार धडक दिली. त्यामुळे ‘नीलकमल’ बोटीला भगदाड पडले. त्यातून पाणी आत शिरल्यामुळे बोट बुडू लागली. अपघाताची माहिती मिळताच नौदल, तटरक्षक दल व मुंबई सागरी पोलिसांच्या पथकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

नौदलाच्या ११ नौका, तटरक्षक दलाची एक व यलोगेट पोलीस ठाण्याच्या ३ नौका तसेच स्थानिक मच्छीमार नौकांच्या सहाय्याने मदतकार्य सुरू करण्यात आले. नौदलाच्या चार हेलिकॉप्टरचीही मदत घेण्यात आली. दोन्ही बोटींवर प्रवासी आणि कर्मचाऱ्यांसह असे एकूण ११५ जणांना बचाव कार्यारत बाचवण्यात आले. यापैकी १५ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातील आठ मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. त्यानंतर हंसाराम भाटी यांचा मृतदेह बोटीच्या सांगाड्यात सापडला होता पण अपघाताला ४८ तासांहून अधिक कालवधी झाला असताना नीलकमल बोटीवरील सात वर्षांचा मुलगा जोहान निसार अहमद हा बेपत्ता होता. शनिवारी त्याचाही मृतदेह सापडला आहे. त्याच्या शोधासाठी तटरक्षक दलाच्या बोटी व हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले होते.

या अपघात वाचलेले नाथाराम चौधरी (वय २२ वर्षे, राहणार साकीनाका, मुंबई) यांनी याप्रकरणी मुंबई पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम १०६(१)), १२५ (अ) (ब), २८२, ३२४ (३)(५) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्याप्रकरणी पोलिसांनी तपासाला सुरूवात केली असून तक्रारदारासह ११ हून अधिक जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. अपघातग्रास्त नीलकमल बोटीची तज्ज्ञांमार्फत तपासणीही केली जाणार आहे. त्यात मेरीटाईम बोर्डाचीही मदत घेण्यात येणार आहे. याशिवाय नौदलाकडूनही याप्रकरणी तपासणी करण्यात येणार आहे. पोलीसही याप्रकरणी नौदलाच्या संपर्कात असून त्यांच्याकडून मदत घेतली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *