गोखले पुलाचे काम अंतिम टप्प्यात, एप्रिलपर्यंत वाहतूक सुरू करण्याचे आव्हान

अंधेरी पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या गोपाळ कृष्ण गोखले उड्डाणपुलाची दुसरी लोखंडी तुळई खाली आणण्याचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून येत्या आठवड्यात हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. तुळई खाली आणल्यानंतर क्रॅश बॅरिअर, डांबरीकरण, पोहोच रस्त्यांची कामे, पथदिवे, मार्गिकांचे रंगकाम अशी विविध कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. पुलाची दुसरी बाजू सुरू करण्यासाठी एप्रिल २०२५ चे उद्दीष्ट्य ठेवण्यात आले आहे.

गोखले पुलाची एक बाजू २६ फेब्रुवारी रोजी सुरू झाल्यानंतर आता दुसरी बाजू कधी सुरू होणार याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे. मात्र या पुलाच्या कामाला वारंवार उशीर होत आहे. पुलाचे बांधकाम सुरू झाल्यानंतर १५ महिन्यांनी एक बाजू सुरू होऊ शकली. यावर्षी एप्रिलच्या सुरुवातीला पुलाच्या दुसऱ्या बाजूच्या तुळईचे भाग दिल्लीहून मुंबईत आणण्यास सुरुवात झाली होती. दुसऱ्या तुळईचे सुटे भाग येण्यास उशीर झाला. त्यामुळे पालिकेचे नियोजनही कोलमडले होते. दुसरी बाजू सुरू करण्याची मुदतही पुढे ढकलावी लागली होती. त्यानंतर तुळईचे सर्व भाग जोडून ५ सप्टेंबरला ही तुळई रेल्वे मार्गावर बसवण्यात आली. मात्र नोव्हेंबर महिना उजाडला तरी तुळई ८ मीटरपर्यंत खाली आणण्याचे काम सुरू झाले नव्हते. मात्र रेल्वेने परवानगी दिल्यानंतर नुकतेच हे काम सुरू झाले असून तुळई पाच मीटरपर्यंत खाली आणण्यात यंत्रणेला यश आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *