कोठडी मृत्यू प्रकरण : पोलीस उपनिरीक्षक ३१ वर्षांनी दोषमुक्त

चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीच्या कथित कोठडी मृत्यूप्रकरणी तपास अधिकारी असलेले पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) सिद्धप्पा सावली हे ३१ वर्षानंतर दोषमुक्त झाले. विभागीय चौकशीत, प्रत्यक्षदर्शींने दिलेल्या साक्षीच्या आधारे सावली यांना दोषमुक्त ठरवण्यात आले होते. त्याचाच आधार घेऊन उच्च न्यायालयाने सावली यांना प्रकरणातून दोषमुक्त केले.

आरोपीला पोलीस ठाण्यात आणण्याचे आदेश सावली यांनीच हवालदारांना दिले होते याचा कोणताही पुरावा किंवा अधिकृत नोंद सकृतदर्शनी दिसून येत नाही, असे निरीक्षणही न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या एकलपीठाने नोंदवले. तथापि, सत्र न्यायालयाने सावली यांच्याबाबत विसंगत निर्णय दिल्याची टिप्पणीही न्यायालयाने केली. सत्र न्यायालयाने तळोजा पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक विनायक जोशी यांना या प्रकरणातून दोषमुक्त करताना सावली यांना दिलासा देण्यास नकार दिला. वास्तविक, सावली यांनी आरोपीला ताब्यात घेण्याचे किंवा हवालदारांकरवी त्याला बेदम मारहाण केल्याचे पुरावे नाहीत. शिवाय, विभागीय चौकशीत सावली यांना हल्ल्याबद्दल माहिती नसल्याचे म्हटले होते. असे असतानाही सत्र न्यायालयाने विभागीय चौकशीतील निष्कर्ष विचारात घेतले नाहीत. त्याचप्रमाणे, जोशी यांना दोषमुक्त करताना सावली यांचा दोषमुक्तीचा अर्ज मात्र नाकारला. सत्र न्यायालयाचा हा निर्णय विसंगत असल्याचे ताशेरे एकलपीठाने ओढले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *