सरकार स्थापण्यात आपला कोणताही अडसर असणार नाही आणि मुख्यमंत्रीपदाबाबत भाजपचे नेतृत्व जो निर्णय घेईल त्याला शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा असेल, असे स्पष्ट करीत काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी शर्यतीतून एक प्रकारे माघारच घेतली. यामुळे आता मुख्यमंत्री भाजपचाच होणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर गुरुवारी होणाऱ्या महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीत मुख्यमंत्री व सत्तावाटपावर निर्णय घेण्यात येणार आहे. या साऱ्या घडामोडींनुसार देवेंद्र फडणवीस यांचीच मुख्यमंत्रीपदी निवड केली जाईल, असे संकेत मिळत आहेत. विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी जाहीर झाला तरी बुधवारी दुपारपर्यंत नवीन सरकार स्थापण्यासाठी महायुतीत काहीच हालचाली दिसत नव्हत्या. मात्र फडणवीस यांनी गुरुवारी दिल्लीत महायुतीच्या नेत्यांची बैठक होईल, असे जाहीर केल्यावर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन तीन दिवसांनंतर मौन सोडले. मुख्यमंत्रीपद कायम ठेवावे, यासाठी शिंदे यांनी गेले दोन दिवस प्रयत्न केले होते. पण १३२ जागा जिंकल्याने भाजपने मुख्यमंत्रीपद सोडण्यास नकार दिला होता. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने मुख्यमंत्रीपद मिळणार नाही, असे संकेत मंगळवारीच दिल्याने मुख्यमंत्री शिंदे यांचा सूर काहीसा नरमला होता. तसेच शिवसेनेच्या प्रवक्त्यांची भाषाही सौम्य झाली होती.
