मुंबईत रात्री काहीसा गारवा आणि दिवसा उकाडा अशी स्थिती असून, किमान तापमानाचा पारा शनिवारी २१.४ अंश सेल्सिअसवर होता. तर कमाल तापमानात चढ – उतार सुरूच आहे. मागील दोन दिवस मुंबईच्या कमाल तापमानात घट झालेली आहे. मात्र, किमान तापमानाचा पारा सध्या चढा असल्याने पहाटे किंचीतसा गारवा असतो.
मुंबई शहर आणि उपनगरांतील नागरिकांना पहाटे गारवा आणि दुपारी उकाडा अशा हवामानाला तोंड द्यावे लागत आहे. कमाल तापमानात घसरण होत असली तरी किमान तापमानाचा पारा अजूनही चढाच आहे. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात बुधवारी ३३.३ तर सांताक्रूझ केंद्रात ३४.३ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. तर दोन्ही केंद्रावरील किमान तापमान अनुक्रमे २३.२ आणि २०.२ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले. सध्या मुंबईत कमाल आणि किमान तापमानामध्ये सातत्याने चढ उतार सुरू आहे. त्यामुळे कधी पहाटे गारवा असतो तर दिवसा उकाडा जाणवतो. दरम्यान, पुढील दोन – तीन दिवस मुंबईतील तापमानात फारसा फरक पडणार नसल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तसेच मध्येच कमाल आणि किमान तापमानात अचानक घट होईल किंवा अचानक वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
उत्तरेकडील थंड वाऱ्याचा प्रवाह वाढल्याने प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्रातील किमान तापमानाचा पारा १२ अंशाखाली घसरला आहे. दरम्यान, रविवारनंतर संपूर्ण राज्यात गारठा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.