राज्यात तळीरामांचे वांदे! एक-दोन नाही 4 दिवस Dry Day घोषित; ‘या’ दिवशी मद्यविक्री बंद

 महाराष्ट्रामध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमधील आज महत्त्वाचा दिवस आहे. राज्यामध्ये 20 नोव्हेंबर रोजी मतदान असल्याने आज प्रचाराच्या तोफा सायंकाळी पाच वाजता थंडावत आहेत. मागील अनेक आठवड्यांपासून सुरु असलेले आरोप-प्रत्यारोप, बैठका, रोड शो, जाहीर सभा या सर्वांना आज सायंकाळी सहानंतर ब्रेक लागणार आहे. विशेष म्हणजे प्रचार संपण्याबरोबरच मतदानाआधी म्हणजेच 18 तारखेला प्रचाराची काळमर्यादा संपल्यापासून म्हणजेच सायंकाळी सहा वाजल्यापासून मद्यविक्री बंद केली जाईल. विधानसभा निवडणुकीच्या महिन्यामध्ये राज्यात एकूण चार दिवस ड्राय डे असणार आहे. हे दिवस कोणते आणि काय निर्बंध असणार पाहूयात. मात्र त्यापूर्वी राज्यातील निवडणुकीचा कार्यक्रम कसा आहे जाणून घेऊयात…

असा आहे निवडणुकीचा पूर्ण कार्यक्रम

महाराष्ट्रातील विधानसभेच्या एकूण 288 जागांसाठी 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी 22 ऑक्टोबर रोजी निवडणूक अधिसूचना जारी झाली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 29 ऑक्टोंबर होती तर 30 ऑक्टोबरला अर्जांची छानणी झाली. अर्ज माघारी घेण्याची मुदत 4 नोव्हेंबरपर्यंत होती. 20 नोव्हेंबर रोजी मतदान झाल्यानंतर तीन दिवसांनी म्हणजेच 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. 25 नोव्हेंबर रोजी राज्यातील निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईल, असं निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमात म्हटलं आहे.

ड्राय डे कधी असणार?

18 तारखेला प्रचार संपल्या संपल्या सायंकाळी सहा वाजल्यापासून मद्यविक्रीवर बंदी असेल. 19 तारखेला आणि मतदानाच्या दिवशी म्हणजेच 20 तारखेलाही राज्यात ड्राय डे असेल. त्याचप्रमाणे मतमोजणीच्या दिवशी सायंकाळी सहा वाजेपर्यंत मद्यविक्री बंद असेल. म्हणजेच महाराष्ट्रामध्ये 18, 19, 20 आणि 23 असे चार दिवस मद्यविक्री बंद असणार आहे. नेमकी ही मद्यविक्री बंदी कधी आणि कशी असेल पाहूयात…

18 नोव्हेंबर : सायंकाळी सहा वाजल्यापासून मद्यविक्री बंद केली जाईल.

19 नोव्हेंबर : मतदानाच्या आधीचा दिवस म्हणून संपूर्ण दिवस मद्यविक्री बंद असेल.

20 नोव्हेंबर : निवडणुकीचा दिवस असल्याने मद्यविक्री दिवसभर बंद राहणार आहे.

23 नोव्हेंबर : मध्यरात्री 12 वाजता दिवस सुरु होतो तिथपासून ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत निवडणूक आयोग निकालाची घोषणा करत नाही तोपर्यंत मद्यविक्री बंद असणार आहे.

या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाते. एखाद्या व्यक्तीकडे या कालावधीमध्ये विनापरवाना मद्यसाठा आढळून आल्याच्या त्याच्याविरोधातही कठोर कारवाई केली जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *