मुंबई विमानतळावरून १२ लाख प्रवाशांची आंतरराष्ट्रीय वारी

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून (सीएसएमआयए) ऑक्टोबरमध्ये विशेषत: दिवाळीच्या सुट्टीत देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील विमान उड्डाणांमध्ये वाढ झाली आहे. ‘सीएसएमआयए’वरून ऑक्टोबरमध्ये १९ हजार ८४८ देशांतर्गत आणि सात हजार २२२ आंतरराष्ट्रीय उड्डाणे झाली. या विमानांमधून ३१ लाखांहून अधिक प्रवाशांंनी देशांतर्गत आणि १२ लाखांहून अधिक प्रवाशांनी आंतरराष्ट्रीय प्रवास केला.

दिवाळीच्या सुट्टीनिमित्त अनेकांनी मुंबईतून अन्य राज्यात, तर काहींनी परदेशात जाण्याचे नियोजन केले होते. त्यानुसार ऑक्टोबरमध्ये ४४ लाखांहून अधिक प्रवाशांना सुविधा उपलब्ध करण्यात आली. सणासुदीच्या हंगामात देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली. २६ ऑक्टोबर २०२४ रोजी, सीएसएमआयएवर एकाच दिवशी सर्वाधिक ९३९ उड्डाणांची नोंद झाली. हा दिवस ऑक्टोबरमधील सर्वात व्यस्त दिवस होता. ऑक्टोबरमध्ये देशांतर्गत ठिकाणांमध्ये दिल्ली, बंगळुरू आणि गोवा या ठिकाणांना सर्वांधित पसंती होती. तर, आंतरराष्ट्रीय ठिकाणांमध्ये दुबई, अबुधाबी आणि लंडनला मोठ्या संख्येने प्रवासी गेले. तसेच सीएसएमआयएवरून मध्यपूर्व, आशिया आणि युरोपीय देशांमध्ये विमान उड्डाणे झाली आहेत. आंतरराष्ट्रीय विमान सेवेत सर्वाधित वाटा हा मध्य पूर्वचा असून एकूण ५१ टक्के आहे. त्यानंतर आशिया दुसऱ्या क्रमांकावर असून २३ टक्के आणि युरोपचा १७ टक्के वाटा आहे, अशी माहिती सीएसएमआयएकडून देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *