महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असून आता प्रचारासाठी केवळ दोन दिवस उरले आहेत. त्यातही शेवटचा शनिवार-रविवार असल्यामुळे सर्वच पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या सभा महाराष्ट्रात ठिकठिकाणी होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी हे विविध ठिकाणी जाहीर सभा घेणार आहेत. तसेच महाविकास आघाडी आणि महायुतीच्या प्रमुख नेत्यांचाही जोरदार प्रचार सुरू आहे. व्होट जिहाद, मशिदीवरील भोंगे हे मुद्दे शेवटच्या टप्प्यात प्रचारात आणण्यात आले आहेत. त्यामुळे या मुद्द्यावरून आता वाद-प्रतिवाद होण्याची शक्यता आहे.
कोल्हापूरमध्ये भाजपाचे खासदार धनंजय महाडिक यांनी लाडकी बहीण योजनेवरून वादग्रस्त विधान केलेले असतानाच आता कोल्हापूरच्या हातकंणगले विधानसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेवरून एक अजब विधान झाले आहे. ५०० रुपयांमध्ये घरचा खर्च चालतो, कुठे आहे महागाई? असा युक्तीवाद भाजपा नेत्या निता दांडेकर-माने यांनी केला आहे. त्या जयसिंगपूर शहराच्या माजी नगराध्यक्ष आहेत. त्यांचे सासरे अशोक माने हे महायुतीचे उमेदवार आहेत.
देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, आपण एक राहिलो तर पाकिस्तानवरही तिरंगा फडकवू. त्यांचे डोके ठिकाणावर आहे का? ही कुठली निवडणूक आहे? पाकिस्तानवर तिरंगा फडकविण्याचे राहुद्या. पण पाकव्याप्त काश्मीर घेण्याच्या वल्गना तुमचे नेते करत आहेत. ते आधी ताब्यात घ्या. तिथे तिरंगा फडकवून दाखवा. मणिपूरला जाऊन तिरंगा फडकवून दाखवा. त्यानंतर लडाखला जिथे चीनने घुसखोरी केली आहे, तिथे जाऊन तिरंगा फडकवून दाखवा. तुम्हाला एखाद्या समाजाची, धर्माची मते मिळत नाहीत, म्हणून व्होट जिहाद म्हणायचे का? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.