महाराष्ट्राच्या १५व्या विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात राष्ट्रीय, राज्यस्तरीय पक्षांसह नोंदणीकृत असे एकूण १५८ राजकीय पक्ष निवडणूक रिंगणात आहेत. सर्वाधिक २३७ उमेदवार हे बहुजन समाज पक्षाने निवडणुकीत उतरवले असून त्यापाठोपाठ वंचित बहुजन आघाडीने २०० उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले आहेत. त्याचबरोबर तब्बल २०८६ अपक्ष राज्यभरात निवडणूक रिंगणात असून यात बंडखोर उमेदवारांचाही समावेश आहे.
राज्यात २०१९ साली झालेल्या निवडणुकीत १२५ राजकीय पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. यंदा ही संख्या १५८वर पोहोचली आहे. महाविकास आघाडीत शिवसेना (ठाकरे) ९५, काँग्रेस १०१, तर राष्ट्रवादी (शरद पवार) ८६ जागा लढत आहे. महायुतीत भाजप सर्वात जास्त म्हणजे १४९ जागा. शिवसेना (शिंदे) ८१, तर राष्ट्रवादी (अजित पवार) ५९ जागा लढवत आहे. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पक्षाचा गट महायुतीचा घटक पक्ष आहे. तरीही आठवले गटाचे ३१ उमेदवार स्वतंत्ररीत्या निवडणूक लढवत आहेत. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला २८८ पैकी फक्त १२५ विधानसभा मतदारसंघांत उमेदवार उभे करता आले आहेत.