छत्रपती संभाजीनगरमधील गंगापूर खुलताबाद मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार प्रशांत बंब यांच्या सभेत गोंधळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे. सभेत दोन तरुणांनी बंब यांना तुम्ही १५ वर्ष आमदार होतात, तर तुम्ही काय काम केलं? असा प्रश्न विचारला असता यावरुन सभेत गोंधळ झाला. तर विरोधक मुद्दामून अशी काही लोक पाठवून सभेत वारंवार गोंधळ घालत असल्याचा आरोप प्रशांत बंब यांनी केला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नेमकं काय घडलं?
गंगापूर खुलताबाद मतदार संघाचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार प्रशांत बंब यांचा प्रचार सुरू आहे. प्रशांत बंब हे या मतदारसंघाचे गेल्या १५ वर्षापासून आमदार आहेत. दरम्यान, प्रशांत बंब यांची गंगापूर खुलताबाद मतदार संघामध्ये कॉर्नर सभा सुरू असताना काही तरुणांनी त्यांना प्रश्न विचारला. तुम्ही १५ वर्षे या मतदारसंघाचे आमदार होतात. तुम्ही काय काम केलं? असा प्रश्न त्यांनी बंब यांना भर सभेत विचारला. अनपेक्षित प्रश्नामुळे प्रशांत बंब यांनी त्यावर उत्तर दिलं. ते म्हणाले की, ”मी आमदार नसलो तर तू मरेपर्यंत पस्तावशील. मी आमदार नसलो तर हे लोकं हालत खराब करतील तुमची”. इथे लोक शांत बसलेले आहेत तू मुद्दाम इथे दादागिरी करत आहेस आणि यांना बाहेर काढा” असं म्हणत बंब यांचे कार्यकर्ते त्या तरुणांवर तुटून पडले.
