बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणात चार आरोपींना २५ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांची १२ ऑक्टोबरला हत्या करण्यात आली. बाबा सिद्दीकी यांना त्यांच्या मुलाच्या कार्यालयाजवळ हल्लेखोरांनी गाठलं. त्यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि तिथून पसार झाले. ज्यातल्या दोन हल्लेखोरांना पोलिसांनी पाठलाग करुन आणि जिवाची बाजी लावून अटक केली. त्यानंतर आणखी दोघांना अटक करण्यात आली. या चारही आरोपींना आता २५ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. गुरमेल सिंग, धर्मराज कश्यप, प्रवीण लोणकर आणि हरीश कुमार या चौघांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली. ही मुदत आज संपली. आज त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केलं तेव्हा त्यांना न्यायालयाने २५ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात भंगार पुरवणाऱ्या भगवंत सिंगलाही अटक
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणाचा पोलिसांकडून कसून तपास सुरु आहे. आज मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने एका आरोपीला अटक केली आहे. हा आरोपी मूळचा राजस्थानमधील उदयपूरचा रहिवासी असल्याची माहिती सांगितली जात आहे. या आरोपीने १२ ऑक्टोबर रोजी बाबा सिद्दिकी यांची हत्या करणाऱ्या आरोपींना शस्त्र पुरवल्याचा आरोप आहे. भगवंत सिंग (३२) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीच नाव असून तो नवी मुंबईत राहत होता. भगवंत सिंग याच्या अटकेनंतर कोठडीत असलेल्या एकूण आरोपींची संख्या १० वर पोहोचली आहे.
