संग्रही असलेली ऐतिहासिक नाणी जतन करण्यासाठी काहीच करत नसल्याबाबत आणि स्वतःचे संग्रहालय मोडकळीस आलेले असताना या नाण्यांच्या संवर्धनाच्या दृष्टीने त्यांचा लिलावही होऊ देत नसल्याबाबत उच्च न्यायालयाने मुंबई विद्यापीठावर मंगळवारी ताशेरे ओढले.
संग्रहालयात काही नाणी आहेत. परंतु, ती पुरातन नाहीत, असे याचिकाकर्त्यांच्या वतीने न्यायालयाला सांगण्यात आले. त्याचीही मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठाने दखल घेतली. तसेच, संग्रहालयातील विद्यापीठाच्या मालकीची नाणी चोरीला गेली आणि त्याविरोधात विद्यापीठाने काहीच पावले उचलली नसल्यावरून न्यायालयाने फटकारले. या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे का, अशी विचारणाही न्यायालयाने केली. त्यावर, नाणी परत करण्यासाठी मोदी यांच्याशी वारंवार संपर्क साधण्यात आला. या प्रकरणी चौकशीही करण्यात आली. परंतु, पोलीस तक्रार केली नाही, असे विद्यापीठाच्या वतीने न्यायालयाला सांगण्यात आले.
