धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूर येथील दीक्षाभूमीवर लाखो अनुयायी एकत्र येतात. राज्यातून रेल्वे मार्गाने तेथे जाणाऱ्या अनुयायांसाठी मध्य रेल्वे प्रशासन विशेष रेल्वेगाड्या सोडणार आहे. मध्य रेल्वेने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी विभाजित करण्यासाठी मुंबई / पुणे आणि नागपूर आणि नागपूर – भुसावळ – नाशिक रोड दरम्यान विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक ०१०१७ विशेष ११ ऑक्टोबर रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दुपारी २ वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी पहाटे ५ वाजता पोहोचेल. या रेल्वेगाडीला ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, चांदूर, धामणगाव, पुलगाव, वर्धा, सिंदी आणि अजनी येथे थांबे असतील.
