दाम्पत्य बॅडमिंटन खेळण्यासाठी निघाले, परतताना काळाची झडप; पतीसमोर अर्धांगिनीचा अंत

रस्त्यावर सकाळी अवजड वाहनांना बंदी असताना, भरधाव डंपरने दुचाकीला धडक दिल्याने चाकाखाली चिरडून महिला ठार झाली. या भीषण अपघातात महिलेचा पती जखमी झाला असून, डंपरचालक पसार झाला आहे. गेल्या १२ दिवसांत डंपरच्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला असून, बेकायदा अवजड वाहतूक पुणेकरांच्या जीवावर बेतते आहे.

सिरीचंदना विश्वनाथ हेवटम (वय ३२, रा. न्याती ईलान, वाघोली, मूळ रा. आंध्र प्रदेश) असे अपघातात जीव गमावलेल्या महिलेचे नाव आहे. त्यांचे पती विश्वनाथ जखमी झाले आहेत. या प्रकरणी लोणीकंद पोलिसांनी डंपरचालकावर गुन्हा दाखल केला आहे. हा अपघात रविवारी सकाळी १० वाजता नगर रस्त्यावरील ‘चितळे स्वीट होम’ समोर झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हेवटम दाम्पत्य आपल्या मित्रांसमवेत रविवारी सकाळी बॅडमिंटन खेळण्यासाठी बायफ रोड परिसरात गेले होते. त्यानंतर घरी परतताना मिठाईच्या दुकानासमोर भरधाव डंपरने हेवटम यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. दुचाकीवर मागे बसलेल्या सिरीचंदना डंपरच्या चाकाखाली चिरडल्या गेल्या, तर त्यांचे पती दूर फेकले गेले. या भीषण अपघातात सिरीचंदना यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर डंपरचालक पळून गेला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ससून रुग्णालयात हलविण्यात आला. या घटनेमुळे नगर रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. नगर रस्त्यावर सकाळी अवजड वाहतुकीस बंदी असताना, त्याचे सर्रास उल्लंघन होत असून, त्यामुळे प्राणांतिक अपघातात होत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *