मुंबईत भाड्याने घर घ्यायचं असेल तर 1 RK साठी जवळपास 16 ते 20 हजार आणि 1BHK साठी 24 ते 30 हजार रुपये मोजावे लागतात. मुंबईत नोकरीसाठी येणारे तरुण-तरुणी, कुटुंब भाड्याच्या घरांमध्ये राहत असतात. भाड्याचं घऱ शोधण्यासाठी एजंट्स किंवा नो ब्रोकर, हाऊसिंग अशा वेबसाईट्सची मदत घेतली जाते. दरम्यान मुंबईत घरांच्या किंमती दिवसेंदिवस वाढत असताना भाड्याने राहणंही काहींनी परवडेनासं झालं आहे. त्यातच आता एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओ व्हायरल होण्याचं कारण म्हणजे यामध्ये 1BHK साठी तब्बल 45 हजार रुपये भाडं मागण्यात आलं आहे.
माटुंगा येथे स्थित हे एक बेडरूमचे अपार्टमेंट आहे. (सामान्य भाषेत याला 1BHK म्हटलं जातं). या घरात एक लहान लिव्हिंग/ड्रॉइंग रूम, बेडरुम आणि एक स्वयंपाकघर आहे. लिव्हिंग रूममधून, एक लहान जिना आहे, जो पोटमाळ्यावर जातो. तिथे सर्व अतिरिक्त सामान ठेवण्यात आल्याचं दिसत आहे. या घरासाठी तब्बल 45 हजारांचं भांडं आकारण्यात आलं आहे.
हा व्हिडीओ इंस्टाग्रामला शेअर करण्यात आला असून कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, “ओल्ड वाईब 1BHK भाड्य़ावर, फक्त 45 हजारांमध्ये”. कॅप्शनमध्ये हे घर माटुंगा पूर्वेला असल्याची माहिती देण्यात आली आहे.
