मुंबई विद्यापीठामार्फत पहिल्यांदाच सर्व शैक्षणिक विभागांसाठी रँकिंग फ्रेमवर्क जाहीर करण्यात आले असून सर्व शैक्षणिक विभाग, उप परिसरे आणि आदर्श महाविद्यालये यांचे विविध निकषांवर मूल्यांकन करून रँकिंग जाहीर केली जाणार आहे. रँकिंगच्या निकषांनुसार सर्वोत्कृष्ट विभागास 5 ते 25 लाखांचे संशोधन अनुदान पुरस्कार, प्रशंसा प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह दिले जाणार आहे. विद्यापीठाअंतर्गत शैक्षणिक विभागांची रँकिंग (युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट रँकिंग फ्रेमवर्क UDRF) जाहीर करणारे मुंबई विद्यापीठ हे पहिले विद्यापीठ ठरले आहे. नुकत्याच 12 सप्टेंबरला पार पडलेल्या व्यवस्थापन परिषदेने या स्तूत्य उपक्रमास मंजूरी दिली आहे.
विद्यापीठाकडून परिमाणात्मक मूल्यांकन प्रणाली तयार
मुंबई विद्यापीठातील विज्ञान शाखेअंतर्गत 15, वाणिज्य व व्यवस्थापन, कौशल्य/ ऑनलाईन शिक्षण आणि आदर्श महाविद्यालये 8, मानव्यविज्ञान आणि सामाजिक शास्त्रे 10, भाषा 15, आंतरविद्याशाखीय 12 आणि विविध 20 अध्यासन केंद्र कार्यरत असून या सर्व विभागांसाठी एनआयआरएफ आणि क्युएस/ टाइम्स रँकिंगच्या धर्तीवर तसेच नॅकच्या गुणांकन पद्धतीनुसार मूल्यांकन केले जाणार आहे. यासाठी विद्यापीठाने परिमाणात्मक मूल्यांकन प्रणाली तयार केली आहे.
