नवाब मलिक यांचा जावई कार अपघातात गंभीर जखमी, समीर खान आणि निलोफर यांच्या थारचा मुंबईत अपघात

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री नवाब मलिक  यांचे जावई समीर खान यांचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात समीर खान यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. यावेळी समीर खान यांच्या पत्नी आणि नवाब मलिक यांची मुलगी निलोफर होत्या, निलोफर यांच्या हाताला दुखापत झाली आहे. थार नावाच्या कारचा हा अपघात झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी कारचालकाला ताब्यात घेतलं असून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

थारचा अपघात नेमका कसा झाला?

समीर खान आणि त्यांची पत्नी निलोफर हे दोघे त्यांच्या घराजवळ असणाऱ्या क्रिटी केअर हॉस्पिटलमध्ये रेग्युलर चेकअपसाठी गेले होते. चेकअप झाल्यानंतर दोघेही बाहेर आले होते. यानंतर समीर खान यांनी चालकाचा थार कार घेऊन येण्यास सांगितलं, यावेळी ड्रायव्हरकडून गाडी आणताना चुकून ब्रेक ऐवजी अॅक्सिलेटरवर पाय पडला आणि थार जोरात येऊन समीर खान यांना धडकली. यामध्ये समीर खान यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या समीर खान आयसीयूमध्ये आहेत. तर निलोफर यांच्या हाताला दुखापत झाली आहे. समीर खान यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवलं गेलं आहे.

अपघातात समीर खान यांच्या डोक्याला दुखापत

कुर्ला भागात जो अपघात झाला त्यात समीर खान यांच्या डोक्याला दुखापत झाली. तसंच त्यांच्या चेहऱ्यालाही इजा झाली. कार चालकाने गाडीचा अॅक्सिलेटर दाबला त्यामुळे गाडी जोरात येऊन समीर खान यांच्यावर धडकली त्यांना कारने फरफटत नेलं. एचडीआयएल वसाहतीच्या भिंतीवर आदळली. या प्रकरणात कार चालक अबुल अन्यारी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातामुळे काही दुचाकीही चिरडल्या गेल्या आहेत. विनोबा भावे पोलीस ठाण्याचे पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *