Hit and Run नं मुंबई हादरली; 24 वर्षीय तरुणाचा मृत्यू; पुणे, वरळीमागोमाग विचित्र अपघाताचा आणखी एक बळी

पुण्यातील कल्याणीनगर आणि मुंबईतील वरळी हिट अँड रन प्रकरण अद्यापही निकाली निघालं नसताना आणि या भयंकर अपघाताच्या आठवणी अद्यापही ताज्या असतानाच एका अतिशय भयंकर अपघातानं पुन्हा एकदा मुंबई शहर हदारलं आहे. हा अपघात इतका भीषण होता, की यामध्ये 24 वर्षीय तरुणाचा मृत्यू ओढावला आहे. या अपघातानंतर पोलिसांनी अल्पवयीन आरोपीसह तीन आरोपींना अटक केली आहे.

मुंबईतील गोरेगाव परिसरात भरधाव कारने दुचाकीस्वारावर धडक दिली, या अपघातामध्ये भरधाव वेगात असणाऱ्या एसयुव्ही कारनं दुचाकीवर असणाऱ्या तरुणाला धडक दिली आणि तो जोरात आदळला. कारनं दिलेली धडक इतक्या गंभीर स्वरुपाची होती, की दुचाकीवर असणाऱ्या तरुणाला घटनास्थळीच गंभीर दुखापत झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तरुणाला रुग्णालयात नेलं पण, तिथं डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

दरम्यान या भीषण अपघातानंतर कार चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. ज्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने तीन जणांना अटक केली असून, त्यापैकी एक अल्पवयीन असल्याचं म्हटलं जात आहे. आरोपींना ताब्यात घेत त्यांची कारही जप्त करत आता पोलीस या प्रकरणी पुढील कारवाई करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *