मंगळावर पाणी असल्याच्या शास्त्रीय निरीक्षणांना पुष्टी देणारे ठोस पुरावे ‘नासा’च्या संशोधक पथकांना उपलब्ध झाले असून याबद्दल सोमवारी रात्री ‘नासा’ने घोषणा केली. मंगळावर केवळ गोठलेल्या बर्फाच्या स्वरुपातच जलसाठे नसून उन्हाळ्यात मंगळभूमीवरील काही डोंगररांगांमधून खारट पाण्याचे लहान प्रवाहही वाहत असतात, असे ‘नासा’ने एका पत्रकार परिषदेत जाहीर केले. नासाच्या या घोषणेमुळे मंगळावर मानवी वसाहती उभारण्याच्या प्रयत्नांना आणखी उमेद मिळाली आहे. ‘मार्स ऑर्बिटर’ने पाठवलेली मंगळाची असंख्य छायाचित्रे आणि इतर उपकरणांनी पाठवलेल्या तपशीलाचा अभ्यास करून हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. जॉर्जिया इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीतील पदवीधर लुजेंद्र ओझा या भारतीय संशोधकाच्या निरीक्षणांनी या निष्कर्षाला पुष्टी देण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. या संशोधनाविषयी एका प्रतिष्ठीत वैज्ञानिक नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या लेखाचे ओझा सहलेखक आहेत.
अॅझोना युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षणादरम्यान ओझा यांना योगायोगाने मंगळावर द्रवरुपात पाणी असल्याचे पुरावे मिळाले होते. या ग्रहाच्या पृष्ठभागाच्या अभ्यासादरम्यान त्यांना याबाबत पुरावे मिळाले होते. ओझा यांनी हा शोध म्हणजे सुदैवी योगायोग असल्याचे म्हटले होते. सुरुवातीला आपल्यालाही याबाबत काही लक्षात आले नाही असे ते म्हणाले होते. मंगळाच्या पृष्ठभागावर तयार झालेल्या खड्ड्यांचा अनेक वर्ष अभ्यास केल्यानंतर हे खड्डे वाहत्या पाण्यापासूनच तयार झाले असल्याचे समोर आले आहे.
सुमारे चार दशकांपूर्वी या प्लॅनेटच्या पोलवर बर्फाचा शोध लावण्यात आला होता. या ग्रहावर द्रवरुप पाणी असल्याचा शोध प्रथमच लागला आहे.

