मेंढपाळाचा लेक PSI झाला, निकाल लागला तेव्हा आई-वडील मेंढरं वळत होते!

पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील असणाऱ्या देऊळगाव गाडा येथील संदीप आनंदा कोकरे या मेंढपाळ मुलाने राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तम गुणाने उत्तीर्ण होत पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली आहे. शाळेला सुट्टी असताना नेहमी मेंढ्या वळणाऱ्या संदीप कोकरे याला मिळालेले यश पाहून, परिसरात त्याचे सर्वत्र कौतुक होत असून शुभेच्छांचा वर्षावही होत आहे.

संदीप कोकरे यांचे वडील आनंदा कोकरे व आई चांगुना हे आई वडील निरक्षर आहेत. त्यांनी संदीप याला मेंढ्या बकऱ्यांचा व्यवसाय सध्या कठीण होत चालला आहे. तू शाळा शिक.. असा सल्ला दिला. त्यानुसार संदीप शाळा शिकू लागला. संदीप पीएसआय झाल्याचे कळले तेव्हा त्याचे आई-वडील बकऱ्या घेऊन माळरानात होते. निकालानंतर संदीपच्या घरी लोकांची रीघ लागली होती. उपस्थित असणाऱ्या लोकांच्या चर्चेमधून संदीपच्या आई-वडिलांना आपल्या मुलाने मोठी काहीतरी कामगिरी केली आहे.. तो मोठा साहेब झाला आहे, असे समजले. संदीप फौजदार झाल्याने गावातील लोकांच्या आनंदाला पारावर राहिला नाही.

आईवडिलांच्या कष्टाचे चीज

पीएसआयचा निकाल लागल्यानंतर संदीप तीन दिवसांनी घरी आला. बापाला कडकडून मिठी मारली. तेव्हा त्यांचे वडील आनंदा कोकरे यांच्या अश्रूंचा बांध फुटला. आई चांगुनाबाई यांनी तर लहान बाळासारखे आपल्या साहेब झालेल्या लेकाचे मटामटा मुके घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *