शाळा, महाविद्यालयांजवळ तंबाखूजन्य पदार्थ विकणाऱ्यांविरोधात धडक कारवाई, सुमारे ९३ किलो तंबाखूजन्य पदार्थ जप्त, चार दुकाने हटवली

वडाळा व शीव परिसरातील विविध शाळा, महाविद्यालये, तसेच अन्य शैक्षणिक संस्थांलगतच्या परिसरामध्ये विडी, सिगारेट, तंबाखू किंवा गुटखा आदी तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरोधात मुंबई महानगरपालिकेने मोठी धडक कारवाई केली. पालिकेच्या एफ (उत्तर) विभागाने मंगळवारी ही कारवाई करून चार दुकाने हटवली. या दुकानांतून एकूण ९३ किलो ५०० ग्रॅम तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आला. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ प्रतिबंध कायदा – २००३ च्या कलम – ४ नुसार, शाळा, महाविद्यालये तसेच अन्य कोणत्याही शैक्षणिक संस्थांलगतच्या परिसरात विडी, सिगारेट किंवा अन्य तंबाखूजन्य उत्पादनांची विक्री करण्यास, तसेच बाळगण्यास प्रतिबंध आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशांनुसार महानगरपालिका कार्यक्षेत्रातील शैक्षणिक संस्थांच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.

शैक्षणिक संस्थांलगतचा परिसर तंबाखूजन्य पदार्थ मुक्त करण्याच्या उद्देशाने सहायक आयुक्त डॉ. पृथ्वीराज चौहान यांच्या देखरेखीखाली एफ उत्तर विभागाने मंगळवारी धडक मोहीम हाती घेतली होती. त्याअंतर्गत दोन वेगवेगळ्या पथकांनी कोकरी आगार येथील म्हाडा कॉलनी परिसरातील प्रियदर्शनी शाळा आणि एस. के. रॉयल शाळा, शीव परिसरातील साधना शाळा, माटुंगा परिसरातील रुईया महाविद्यालय आणि पोतदार महाविद्यालय, मंचेरजी जोशी उद्यान (फाइव्ह गार्डन) परिसरातील वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्था (व्हीजेटीआय), तसेच माहेश्वरी उद्यान परिसर या ठिकाणी कारवाई करून ९५ किलो ५०० ग्रॅम तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आला. त्यामध्ये विडी, सिगारेट, तंबाखू, गुटखा आदींचा समावेश आहे. तसेच या ठिकाणी असलेले तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्यात येत असलेले एक दुकान आणि तीन बाकडे निष्कासित करण्यात आले. कारवाईदरम्यान कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *