तू माझ्या मुलाकडचे पैसे का मागत आहेस? आईची महिलेला जबर मारहाण

आपल्या मुलाने गावातील एका व्यक्तीस दोन हजार रुपये दोन महिन्यांपूर्वी उसने दिले होते. पण संबंधित व्यक्ती तो पैसे परत करत नव्हता. त्यामुळे मुलाच्या आईने स्वतः मुलाने दिलेले उसने पैसे मागितले. दिलेले पैसे का मागितले यावरून वाद वाढत गेला आणि दोन महिलांनी मिळून पैसे मागणाऱ्या महिलेस मारहाण सुरू केली. संबंधित महिलेच्या केसाला धरून तिचे डोके रस्त्यावर आपटल्याने महिलेचा मृत्यू झाला. मृत महिलेचे नाव रेखा विष्णू लोखंडे असून ती परभणीच्या सोनपेठ तालुक्यातील शेळगाव येथील रहिवासी आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मयत रेखा विष्णू लोखंडे हिचा मुलगा गणेश लोखंडे याने गावातीलच राहुल घुमरे यास दोन महिन्यापूर्वी दोन हजार रुपये उसने दिले होते. पण राहुल हा वेळोवेळी पैसे मागूनही परत करत नव्हता. त्यामुळे गणेशने आपली आई रेखा हिला हा सर्व प्रकार सांगितला. आई रेखाने मी स्वतः त्यांच्याकडून पैसे घेते असे देखील सांगितले. रेखा लोखंडे या राहुल घुमरे यास पैसे मागू लागल्या. पण रेखा यांना देखील तो पैसे देत नव्हता. त्यामुळे रेखा यांनी राहुलच्या घरी त्याच्या आईकडे पैसे मागण्यास सुरुवात केली. दोन हजार रुपयावरून दोन्ही कुटुंबांमध्ये वाद सुरू झाला.

मंगळवारी सकाळी दहा ते अकराच्या दरम्यान रेखा लोखंडे या रस्त्याने जात असताना त्यांना महाकाली उर्फ त्रिवेणी घुमरे आणि मनकर्णा नवनाथ रणखांब या दोघी भेटल्या. रेखा यांनी महाकाली यांना ”तुमच्या मुलाकडील असलेले दोन हजार रुपये परत करा”, असे मागणी केली. ”तू माझ्या मुलाकडचे पैसे का मागत आहेस?, असे म्हणून रस्त्यावरच भांडण सुरू झाले. महाकाली आणि मनकर यांनी रेखा यांच्या केसाला पकडून मारहाण सुरू केली. रेखाच्या केसांना पकडून त्यांचे डोके रस्त्यावर जोरजोराने आपटण्यास सुरुवात केली. सिमेंट रोडवर डोके आपटल्याने रेखा गंभीर जखमी झाल्या रेखा यांचा जागीच मृत्यू झाला.

या प्रकरणी सोनपेठ पोलीस ठाण्यात दोन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती कळत आज सोनपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्य मोहन बोलमवाड घटनास्थळी दाखल झाले. रेखाला मारणाऱ्या दोघी महिला या बहिणी बहिणी आहेत. महिलांनीच महिलांचा खून केल्याने सोनपेठ सह जिल्हाभरामध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *