रशियात चार भारतीय विद्यार्थ्यांचा नदीत बुडून मृत्यू झाला असल्याची घटना समोर आली आहे. हे चारही विद्यार्थी भारतातील असून रशियामधील यारोस्लाव-द-वाईज नोव्हगोरोड स्टेट युनिव्हर्सिटीजमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत होते. सेंट पीटर्सबर्गच्या जवळील एका नदीच्या काठावर हे विद्यार्थी सायंकाळच्या वेळेला फिरण्यासाठी गेले असता तेथे एका मित्राला वाचवताना ४ भारतीय विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला आहे.
वृत्तानुसार, एकजण नदीमध्ये उतरला होता. मात्र, तो नदीत बुडायला लागल्यामुळे त्याला मदत करण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांचाही बुडून मृत्यू झाला आहे. यापैकी एकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला असून उर्वरित तिघांचा शोध सुरू आहे. दरम्यान, हे सर्व विद्यार्थी महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील असल्याची माहिती सांगण्यात आली आहे.
