डोंबिवली, मुंबई, नवी मुंबई परिसरात घरफोड्या करणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना मानपाडा पोलिसांनी उत्तरप्रदेशातील त्यांच्या मूळ गावांमधून कौशल्याने अटक केली आहे. त्यांच्याकडून २३ लाखाचा सोने, चांदीचा चोरीचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. या दोन्ही आरोपींवर एकूण यापूर्वी २० गुन्हे दाखल आहेत.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने, साहाय्यक पोलीस निरीक्षक संपत फडोळ यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाचे एक पथक आरोपी राहत असलेल्या गावी गेले होते. तेथे त्यांनी काही दिवस पाळत ठेऊन आरोपी त्यांच्या गावात राहतात का याची खात्री केली. आरोपी गावातील घरीच असल्याचे समजल्यावर पोलिसांनी पहाटेच्या वेळेत दोघांच्या घरावर एकाचवेळी रात्रीच्या वेळेत छापा टाकला. दोन्ही आरोपींना अटक केली.त्यांच्याकडून ३२५ ग्रॅम वजनाचे सोने, चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.कहार याच्यावर १३, चौधरीवर सात गुन्हे दाखल आहेत. या आरोपींनी यापूर्वी मुंबई, नवी मुंबई, ठाणे पोलीस आयुक्तालय भागात चोऱ्या केल्या होत्या. त्यांना यापूर्वी मुंबई पोलिसांनी अटक केली होती. या आरोपींनी फरार असताना किती गुन्हे केले आहेत. याचा तपास पोलीस करत आहेत. डोंबिवली शहर परिसरातील अनेक गुन्हे याचोरट्यांमुळे उघड होण्याची शक्यता वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांनी व्यक्त केली.