नरेंद्र मोदी न्यूयॉर्कमध्ये दाखल

नरेंद्र मोदी न्यूयॉर्कमध्ये दाखल

एक दिवसाचा आयर्लंड दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी पहाटे न्यूयॉर्कमध्ये दाखल झाले. पाच दिवसांच्या अमेरिका दौ-यात मोदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची भेट घेणार आहेत.

मात्र त्यापूर्वी मोदी फॉर्च्युन ५०० मधील आघाडीच्या कंपन्यांचे सीईओ, संस्थापकांना भेटणार आहेत. मेक इन इंडिया कार्यक्रमातंर्गत जास्तीत जास्त परदेशी गुंतवणूक भारतात आणणे हा या दौ-यामागील मोदी यांचा मुख्य उद्देश आहे. त्यासाठीच ते अमेरिकेतील प्रमुख कंपन्यांच्या सीईओंची भेट घेणार आहेत.

मायकल ब्लूमबर्ग, लॉकहीड मार्टीन कॉर्पोरेशनचे सीईओ मॅरीलीन ए. हीवसन, माध्यमसम्राट रुपर्ट मरडॉच यांची मोदी स्वतंत्र भेट घेणार आहेत. या पाच दिवसीय दौ-यात मोदी यांचा अनेक जागतिक नेत्यांबरोबर व्दिपक्षीय चर्चेचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे.

२८ सप्टेंबरला ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची भेट घेणार आहेत. भारत, जर्मनी, ब्राझील आणि जापान या चार देशांची जी-४ परिषदेची बैठक २६ सप्टेंबरला होईल. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत सुधारणा करण्यासाठी चर्चेचा प्रस्ताव मागच्या आठवडयात मंजूर झाला आहे. भारताला सुरक्षा परिषदेचे कायमस्वरुपी सदस्यत्व आणि नकाराधिकार मिळावा यासाठी जास्तीत जास्त पाठिंबा मिळवण्याचा उद्देशही मोदी या दौ-यातून साध्य करण्याचा प्रयत्न करतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *