जनरल कोचमधील प्रवाशांना उन्हाळी हंगामात स्वस्त दरात म्हणजे वीस रुपयांत जेवण पुरविण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.
भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनच्या (आईआरसीटीसी) सहकार्याने प्रवाशांना, विशेषत: अनारक्षित डब्यांमध्ये स्वस्त दरात स्वच्छ अन्न आणि नाश्ता उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या डब्यात उन्हाळ्यात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी होते. रेल्वेत त्यांच्यासाठी सोयीस्कर आणि परवडणारे अन्न उपलब्ध नसते. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
प्रवाशांना वीस रुपयांत जेवणाची पाकिटे दिली जाणार आहेत. ज्यांना हलका नाश्ता हवा आहे, त्यांच्यासाठी पन्नास रुपयांचे स्नॅक्सही उपलब्ध आहे. हे जेवण आणि पाणी प्लॅटफॉर्मवरील अनारक्षित डब्यांजवळील काऊंटरवर उपलब्ध आहे. त्यामुळे विक्रेत्यांना शोधण्याची किंवा स्टेशनबाहेर जाण्याची गरज राहणार नाही.
– इगतपुरी, मनमाड, खंडवा, बडनेरा शेगाव, पुणे, मिरज, दौंड, साईनगर शिर्डी, नागपूर, वर्धा, सोलापूर, कुर्डुवाडी य़ा स्थानकांवर ही सुविधा
– गेल्या वर्षी ५१ स्थानकांवर या सेवेची यशस्वी चाचणी घेण्यात आली. त्या आधारे रेल्वेने कार्यक्रमाचा विस्तार केला
– आता शंभराहून अधिक स्थानकांवर आणि १५० काऊंटरवर ही सुविधा असून, भविष्यात आणखी स्थानकांचा समावेश
