भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेतील (आयसर) पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशांसाठी संयुक्त प्रवेश परीक्षेचे (जेईई) गुणही ग्राह्य धरले जात होते. मात्र, यंदा आयसरचे प्रवेश केवळ आयसर ॲप्टिट्यूड टेस्ट (आयएटी) या प्रवेश परीक्षेद्वारे होणार असून, जेईईचे गुण ग्राह्य धरले जाणार नाहीत.
आयसर ही शिक्षण संस्था केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या अखत्यारितील आहे. पुण्यासह तिरुपती, भोपाळ, मोहाली, तिरुअनंतपुरम, कोलकाता, बेहरामपूर या सात ठिकाणी आयसरची शैक्षणिक संकुले आहेत. विज्ञान आणि मानव्यविज्ञानातील पदवी, पदव्युत्तर, संशोधनातील चार वर्षांचा पदवी (बीएस) अभ्यासक्रम, पाच वर्षांचा पदव्युत्तर पदवी (बीएस-एमएस) हे अभ्यासक्रम येथे राबवले जातात. गेल्या काही वर्षांत आयसरने विज्ञान, संशोधनाच्या क्षेत्रात ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे आयसरच्या प्रवेशासाठीही मोठी चुरस पाहायला मिळते.
