किनारपट्टीचा भाग वगळता पुढील दोन दिवस राज्यभरात मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गुजरातमधील सौराष्ट्र-कच्छ परिसरात हवेची चक्रिय स्थिती निर्माण झाली आहे. या चक्रिय स्थितीपासून कर्नाटकपर्यंत द्रोणिका रेषा तयार झाली आहे. ही द्रोणिका रेषा वातावरणाच्या खालच्या स्तरातील निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्यात बाष्पयुक्त वारे येत आहे. राज्यात आग्नेय दिशेने बंगालच्या उपसागरावरून काही प्रमाणात बाष्पयुक्त वारे येत आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस किनारपट्टी वगळता राज्याच्या अन्य भागांत मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मागील तीन दिवसांपासून विदर्भात गारपीट होत आहे. या गारपिटीपासून विदर्भाला दिलासा मिळणार आहे. आज, शनिवारपासून पुढे विदर्भात गारपीट होण्याची शक्यता नाही.
