मुंबईतील सर्वात मोठं रेल्वे टर्मिनस उभारण्याची तयारी, कांदिवलीमध्ये जमीन निश्चित; प्रकल्पासमोर एक अडथळा

पश्चिम रेल्वे लांब पल्ल्यांच्या ट्रेनसाठी महामुंबईतील सर्वात मोठं टर्मिनल उभारण्याच्या तयारीत आहे. यासाठी कांदिवलीची निवड करण्यात आली आहे. यामुळे मुंबई सेंट्रल आणि वांद्रे टर्मिनसवरील भार कमी होण्यास मदत होणार आहे. दररोज तब्बल ५४ मेल/एक्सप्रेसची वाहतूक वाढण्याची शक्यता आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी संरक्षण मंत्रालयाची जमिनीची आवश्यकता आहे.

कोणाला फायदा होणार?

सध्या पश्चिम रेल्वे यासाठी प्रस्ताव तयार करत आहे. हा प्रस्ताव तयार होताच पश्चिम रेल्वे प्रकल्पासाठी जमिनीच्या हस्तांतरणासाठी संरक्षण मंत्रालयाची परवानगी घेतली जाणार आहे. या नव्या टर्मिनलवरून दररोज सुमारे एल लाख नव्या प्रवाशांना सेवा मिळू शकते. मुंबईहून गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि बिहारला जाणाऱ्या प्रवाशांसाठी मोठा फायदा होता. यामुळे मुंबई महानगर प्रदेशातील लांब पल्ल्यांच्या ट्रेनची संख्या वाढणार आहे.

मुंबईतील ८० टक्के लांब पल्ल्याच्या गाड्या मुंबई सेंट्रल आणि वांद्रे टर्मिनसवरून रवाना होतात. त्यामुळे या टर्मिनलवर ट्रेनची संख्या वाढवणं शक्य नाही. कांदिवली गुड्स यार्डजवळ १,१०० मीटर बाय ४०० मीटर भूखंडावर हे टर्मिनल प्रस्तावित आहे. या जमिनीवर नऊ प्लॅटफॉर्म, पिट लाइन आणि ट्रेनच्या देखभालीसाठी पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी पुरेशी जागा उपलब्ध आहे. मात्र ही जमीन सध्या संरक्षण मंत्रालयाच्या ताब्यात आहे.

कांदीवली ते मालाडदरम्यान दुसरा भूखंड

फेब्रुवारी २०२५ रोजी या जागेची संयुक्त पाहणी करण्यात आली होती. त्यानंतर रेल्वेने ती जमीन हास्तंरित करण्यासाठी संरक्षण मंत्रालयासमोर औपचारिक प्रस्ताव सादर केला. तसेच, कांदिवली आणि मालाडदरम्यान दुसऱ्या ७०० बाय ६०० मीटर भूखंडाची पाहणी करण्यात आली आहे. पण ही जमीन लहान असल्यामुळे प्रत्यक्ष टर्मिनसऐवजी पिट लाइनसारख्या इतर पायाभूत सुविधा उभारली जाणार आहे. कांदिवली कार शेड आणि पोईसर मेट्रो स्थानकालगतची ही जमीन असेल. ट्रेनच्या डब्यांची दुरूस्ती आणि सर्व गाड्या नियमितपणे तपासण्साठी दोन समर्पित ‘शंटिंग नेक’ही उभारले जाणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *